इम्फाळ/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये जुलै महिन्यात झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चारजणांना अटक केली असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. चौघांना विमानाने अधिक चौकशीसाठी आसाममधील गुवाहाटी येथे नेण्यात आले आहे.
या चौघांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पाओमिनलून हाओकीप, मालसॉन हाओकीप, लिंगनेइचॉन्ग बाईट आणि तिन्नेखोल अशी आरोपींची नावे आहेत. लिंगनिचॉन्ग बाईटे हा खून झालेल्या विद्यार्थिनीचा मित्र होता. संशयितांपैकी एक महिला चुरचंदपूर येथील बंडखोराची पत्नी आहे. तसेच मणिपूरची राजधानी इम्फाळ येथून याप्रकरणी दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौघा संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच काही लोकांनी विमानतळाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने विमानाने वेळेत उड्डाण केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.