Pune news : पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक उत्साहात | पुढारी

Pune news : पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक उत्साहात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 1) मिरवणूक काढण्यात आली. दुपारी अडीच वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यात 100 पेक्षा अधिक मंडळे सहभागी झाली. या वेळी मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने पाणी, सरबत, अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. अनंत चतुर्दशी आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्यामुळे हिंदू-मुस्लिम धर्मीयांत सलोखा राखण्यासाठी ही मिरवणूक 1 ऑक्टोबर रोजी काढण्याचा निर्णय सिरत कमिटीने घेतला. त्यानुसार रविवारी दुपारी नाना पेठेतील मनुशाह मशीद येथून या जुलूसला (मिरवणूक) सुरुवात झाली.

संबंधित बातम्या : 

पेंशनवाला मशीद, दुल्हा-दुल्हन कब—स्तान, बाबाजान दर्गाह, एमजी रोड, साचापीर स्ट्रीट, क्वॉर्टर गेट, नाना पेठ, गणेश पेठ, जामा मशीद या भागांतून हा जुलूस काढण्यात आला. या वेळी धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील व्यक्ती उपस्थित होत्या.
मौलाना गुलाम आहेमद कादरी, मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन, हाफिज ऐतेशाम, रुफोदिन शेख, नदिम मुजावर, आशिफ शेख यांच्यासह सिरत कमिटीचे सदस्य आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.

महात्मा गांधी (एमजी) रस्त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अन्य राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आलेल्या मुस्लिम बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्यासाठी पाणी, सरबत वाटप करण्यात आले.

100 पेक्षा अधिक मंडळांचा सहभाग
शहरातील मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शहरातील विविध भागांतून मंडळे विद्युतरोषणाई आणि डीजेच्या आवाजात एमजे रस्त्याकडे येत होती. कोंढवा, कात्रज, गुलटेकडी, मोमिनपुरा, स्वारगेट, घोरपडी, शुक्रवार पेठ, भवानी पेठ, कॅम्प परिसरातील 100 पेक्षा अधिक मंडळे मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती.

Back to top button