गृहकर्जाच्या वाढत्या व्याजदरानंतरही विक्रीत वाढ

गृहकर्जाच्या वाढत्या व्याजदरानंतरही विक्रीत वाढ
पुणे : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख बाजारपेठांमधील विक्री अनुक्रमे 39 टक्के आणि 16 टक्क्यांनी वाढली आहे. व्याजदरामध्ये वाढ झाली असली, तरी पुण्यात घर खरेदीचा टक्काही वाढत असल्याचे वास्तव समोर आले आहे.  गेल्या वर्षभरात गृहकर्जाचे दर गगनाला भिडले आहेत. असे असतानाही घरांच्या विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही. या वर्षी केवळ घरांच्या विक्रीलाच वेग आला नाही, तर नवीन प्रकल्पही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत.
संबंधित बातम्या : 
रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल रिपोर्टनुसार, भारतातील टॉप आठ शहरांमध्ये या वर्षी  घरांच्या विक्रीत मजबूत वाढ झाली आहे. हैदराबादमधील घरांच्या विक्रीत 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 6,560 युनिट्सच्या तुलनेत ही संख्या 10,200 पर्यंत वाढली आहे.  मुंबईत निवासी मालमत्तेची विक्री 2023 च्या पहिल्या तिमाहीत 32,380 युनिट्सपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. जी गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 23,370 युनिट्स होती. पुण्यातील निवासी विक्री 2023 च्या पहिल्या तिमाहीत 18,920 युनिट्सपर्यंत वाढली, जी मागील वर्षीच्या कालावधीत 16,320 युनिट्स होती.  भारतीय गृहनिर्माण व्यवसाय बाजारात जोरदार वाढ होत आहे. 2023 वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विक्री आणि नवीन लॉन्च या दोन्हीमध्ये वाढ झाली. याचबरोबर ही वाढ आताही कायम राहत आहे. आव्हानात्मक जागतिक वातावरण आणि देशांतर्गत बाजारपेठेतील गृहकर्जावरील  वाढते व्याजदर लक्षात घेता हे उल्लेखनीय आहे.

 प्रत्येकाचे घर घेण्याचे एक स्वप्न असते. त्यामुळे त्या स्वप्नाचा पाठलाग करीत नागरिक आपले घराचे स्वप्न साकारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. घराच्या साहित्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मेट्रो शहरात आपल्या हक्काचे घर असणे आवश्यक आहे. त्यामुळे कधी ना कधी घर खरेदी करावेच लागते. घरामध्ये लवकरात लवकर होणारी गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरते

                                                              – सतीश मगर, राष्ट्रीय क्रेडाई, अध्यक्ष

सध्याच्या काळात घराचे भाडेही मोठ्या प्रमाणात महागलेले आहे. त्यामुळे भाडे भरण्यापेक्षा हप्ते भरण्यावर लोक अधिक भर देत आहेत. आपल्या स्वत:च्या घराचे महत्त्व नागरिकांना समजले आहे. त्यामुळे घर विकत घेण्याला प्रतिसाद मिळत आहे. 

                                                          – गजेंद्र पवार,  बांधकाम व्यावसायिक

सध्याच्या किमतीदेखील वाढल्या असल्या, तरी भविष्यातदेखील घरांच्या किमती कमी होणार नाहीत, त्या वाढतच राहणार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने वेळेत घरखरेदी हाच एकमेव चांगला पर्याय असतो. ग्राहकांना याबद्दल चांगली माहिती आहे. त्यामुळे लोक अधिक प्रमाणात घरखरेदीवर भर देतात.

                                                        – महेश कुंटे, बांधकाम व्यावसायिक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news