लोणावळा : दोन बालकांसह एका महिलेची पोलिसांकडून सुटका | पुढारी

लोणावळा : दोन बालकांसह एका महिलेची पोलिसांकडून सुटका

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बालकांसह महिलेचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा पोलिसांना आले आहे. तसेच, दोन बालकांसह एका महिलेची सुटका करीत जबरी चोरीचे दोन गुन्हेदेखील उघडकीस आणण्यात आले आहेत.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना खबर्‍यामार्फत बातमी मिळाली होती की, लोणावळा परिसरातील कांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणार्‍या लोकांना मारहाण करून लुटमार करतात. तसेच, त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांच्याकडून काम करून घेत होते.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने सदरची बाब त्यांनी पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना सांगितली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व लोणावळा पोलिसांनी हनुमान टेकडी, क्रांतीनगर परिसरातून राज सिद्धेश्वर शिंदे (वय 25) आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे (वय 41, दोघे रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ) यांना अटक केली.

राज शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांच्याकडे खबरीच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका महिलेस लोणावळा ठाण्याबाहेरील परिसरातून चाकूचा धाक दाखवून पळवून नेले आणि राहत्या घरी नेऊन डांबून ठेवले. तिच्याकडील मोबाइल व रोख रक्कम मारहाण करून काढून घेतली. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सांगितली.

या महिलेस राज शिंदे याच्या राहत्या घरातून सोबत घेऊन सुटका करण्यात आली असून, तिचा चोरी केलेला मोबाइलदेखील मिळून आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून लोणावळा शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, प्रदीप चौधरी, अभिजित सावंत, प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, अतुल डेरे, राजू मोमीण, दीपक साबळे, विक्रम तापकीर, राहुल घुबे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, दता तांबे, संदीप वारे, तुषार भोईटे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, सुनील पवार यांनी केली आहे.

आरोपींनी पर्यटकांना लुटले

पोलिस चौकशीत राज शिंदे याने 17 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने सहारा ब्रीजजवळ फिरण्यास आलेल्या पर्यटकांना चाकू व कुर्‍हाडीने मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे कपडे, मोबाइल व रोख रकमेची चोरी केली होती. राज शिंदे याच्याजवळ मिळून आलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल हा त्याच घटनेतील असल्याचे त्याने सांगितले. या प्रकाराबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, 23 जानेवारी 2023 रोजी याच टोळीने लोणावळा ब्रीजजवळ डोंगराच्या पायथ्याला पर्यटकांना मारहाण करून लुटले असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याबाबत लोणावळा शहर स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

बालकांना केली मारहाण

पीडित महिलेची सुटका करतेवेळी त्या ठिकाणी आणखी दोन बालके (अल्पवयीन मुलगी व अल्पवयीन मुलगा) मिळून आल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली. 9 सप्टेंबर 2023 रोजी राज शिंदे, त्याची पत्नी करिना ऊर्फ माही राज शिंदे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने लोणावळा स्टेशनच्या बाहेरील परिसरातून मोटारसायकलवर जबरदस्तीने बसविले व पळवून आणून घरात साखळीने बांधून डांबून ठेवले. तिला उपाशी ठेवून घरातील काम करायला लावून हाताने, सळईने मारहाण केली. तसेच तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्याचबरोबर अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास डांबून ठेवून त्याच्याकडूनदेखील कामे करून घेतली. पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क करून तिच्या आईने लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

दहा जणांची टोळी

एकूण दहा जणांच्या टोळीमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालक, तीन महिला, पाच पुरुष असून त्यांच्यापैकी दोन पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना येरवडा पुणे येथील बाल निरीक्षण गृह येथे ठेवण्यात आले आहे. इतर सहा आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा

रालोआ मजबुतीसाठी भाजपची त्रिसूत्री!

संपूर्ण महाराष्ट्रात रंगला श्रावणमेळा

रायगड : पेझारी येथे वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू

Back to top button