रालोआ मजबुतीसाठी भाजपची त्रिसूत्री! | पुढारी

रालोआ मजबुतीसाठी भाजपची त्रिसूत्री!

अजय बुवा

नवी दिल्ली : संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात (आताचे संविधान सदन) महिला आरक्षण विधेयकाची चर्चा होती. सोबतच अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) भाजपची साथ सोडणार अशी कुजबूजही ऐकायला मिळाली होती. एका केंद्रीय मंत्र्याला याबद्दल विचारल्यानंतर त्याने म्हटले होते की सब अच्छा होगा..! आठवडाभरात कर्नाटकमधील धर्मनिरपेक्ष जनता दलाने भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच एनडीएमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एआयडीएमकेने अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. इंडिया आघाडीविरुद्ध आहे ते मित्र टिकविणे, नवे मित्र जोडणे आणि विरोधकांच्या मैत्रीला सुरूंग लावणे या त्रिसूत्रीवर भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.

एआयएडीएमके हा भाजप आणि एनडीएची साथ सोडणारा चौथा मित्रपक्ष आहे. याआधी शिवसेना, अकाली दल आणि संयुक्त जनता दल या पक्षांनी एनडीएपासून फारकत घेतली होती. कर्नाटकमधील सत्ता गमावल्यानंतर भाजप आता केवळ उत्तर भारतातला पक्ष उरला असून, या पक्षाला आता दक्षिणेत स्थान नाही, हा समज एआयडीएमकेच्या जाण्याने द़ृढ होणे भाजपला खचितच परवडणारे नव्हते. त्यामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाला सोबत आणून भाजपने यावर उतारा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. एआयएडीएमकेने आपली नाराजी केवळ भाजपच्या प्रदेश नेतृत्वापुरता मर्यादीत ठेवून भविष्यात पुन्हा परतण्यासाठीचा दरवाजा किलकिला ठेवल्याचे म्हणता येईल. परंतु, इथे मुद्दा येतो तो मित्रपक्षांनी सोडून जाण्याचा.

शिवसेना, अकाली दलासारखे प्रदीर्घ काळ सोबत राहिलेले पक्ष सोडून गेल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी केवळ तोंडी लावायला होती. भाजप फार काळ अन्य पक्षांना सोबत ठेवू इच्छित नाही किंवा ज्यांना राहायचे असेल तर त्यांनी भाजपच्या अटी-शर्तींवर राहावे, असेच चित्र होते. 26 विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तयार झाल्यानंतर एनडीएला उजाळा मिळाला आहे आणि निवडणुकीपर्यंत तो कायम राहणार एवढे नात्र निश्चित. खरे तर, भाजप हा अतिशय व्यवहारी पक्ष आहे. आपल्या विचारसरणीनुसार धोरण राबविण्यासाठी सत्ता हे या पक्षाचे महत्त्वाचे साधन आहे. ते हातात ठेवण्यासाठी बिनधास्तपणे व्यवहारिक तडजोडी करण्यासाठी हा पक्ष मागेपुढे पाहत नाही. ऑपरेशन कमळ असो किंवा महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि नंतरचा सरकारमधील सहभाग असो, ही त्याची वानगी दाखल उदाहरणे म्हणता येतील.

सातत्या राखण्याचे आव्हान

लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये मोदी लाटेच्या आधारे दोनदा स्वबळावर विक्रमी बहुमताचा आकडा गाठला असला. परंतु, आता सर्व विरोधी पक्ष इंडिया या नावाखाली एकत्रितपणे मुकाबल्याच्या इराद्याने मैदानात उतरणार असतील तर तिसर्‍यांदा या कामगिरीमध्ये सातत्य ठेवणे आणि 350 हून अधिक जागांवर दावा सांगणे, तेवढे सोपे नाही, याची भाजपला जाणीव आहे. म्हणूनच, विरोधकांच्या इंडिया आघाडीविरुद्ध आहे ते मित्र टिकविणे, नवे मित्र जोडणे आणि विरोधकांच्या मैत्रीला सुरूंग लावणे या त्रिसूत्रीवर भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. धर्मनिरपेक्ष जनता दलाशी मैत्री हा त्याच धोरणाचा भाग म्हणता येईल. याच धोरणामध्ये बिहारमधील उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष एनडीए आघाडीत आल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही.

निवडणुकीच्या काळात नवे मित्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागणे ही भाजपची भूमिका एका अर्थाने प्रतिक्रियावादीच म्हणावी लागेल. जो पक्ष आतापर्यंत सातत्याने प्रचाराची दिशा ठरविणारा आणि अन्य पक्षांना त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाग पडणारा राहिला हा पक्ष विरोधकांच्या आघाडीचे इंडिया नावाने बारसे होणे या खेळीने पहिल्यांदाच गांगरलेला दिसला. बंगळूरमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, ठाकरे गटाची शिवसेना, पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या 26 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया नावाने आघाडी तयार केल्यानंतर भाजपकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया सुरू झाल्या. ज्या दिवशी बंगळूरमध्ये इंडियाच्या 26 पक्षांची बैठक झाली. त्याच दिवशी भाजपने 36 पक्षांची बैठक घेऊन आम्हीच कसे सर्वसमावेशक दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधकांच्या आघाडीची परिवारवादी, घमंडिया, इंडी, सनातन विरोधी यासारख्या शब्दावलीने हेटाळणी होऊनही भाजपला अद्याप तरी अपेक्षित परिणाम साधता आलेला नाही.

बेरजेचे राजकारण

केवळ, संसदेच्या विशेष अधिवेशाच्या निमित्ताने एक देश एक निवडणूक, महिला आरक्षण विधेयक यासारखे मुद्दे चर्चेत आल्यानंतरच इंडिया आघाडीवरील चर्चेचा झोत कमी झाला. तरीही, एकास एक लढतीची धास्ती भाजपला आहे. त्यामुळे लोकसभेची रंगीत तालीम म्हटल्या जाणार्‍या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि त्यानंतरच्या थेट निवडणुकांमध्ये कोणतीही जोखीम नको, यासाठी भाजपने आपली प्रतिमा बदलण्याचे आणि मित्रपक्षांच्या बेरजेचे प्रयत्न सुरू केल्याचे म्हणावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या तुल्यबळ नेता विरोधकांकडे नसणे, अलीकडचे जी-20 चे जागतिक पातळीवरील यश, नारीशक्ती वंदन कायदा या सर्व गोष्टी भाजपच्या आघाडीत आणखी नव्या पक्षांना आणतील की, इंडिया आघाडीत फाटाफूट होऊन बिगरभाजप, बिगरकाँग्रेस पक्षांची नवी आघाडी अस्तित्वात येईल, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Back to top button