संपूर्ण महाराष्ट्रात रंगला श्रावणमेळा | पुढारी

संपूर्ण महाराष्ट्रात रंगला श्रावणमेळा

पुणे : पहिला श्रावणमेळा कार्यक्रम नुकताच पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात पार पडला. कस्तुरी सदस्यांच्या उपस्थितीने सभागृह खचाखच भरले होते. श्रावणमेळा कार्यक्रमाची सुरुवात मंगळागौर आरतीने झाली. मंगळागौरच्या खेळातून महिला जतन करतात ती मराठी संस्कृती आणि परंपरा… हेच चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमात सादर झालेल्या मंगळागौरची गाणी आणि खेळांमध्ये महिलाही सहभागी झाल्या आणि त्यांनी या मंगळागौरच्या प्रत्येक खेळात हिरीरीने सहभाग घेतला.सोनी मराठीवरील ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारे अजिंक्य राऊत (राजवीर) व जान्हवी तांबट (मयूरी) या कलाकारांनी हजेरी लावत कस्तुरींशी मनमोकळा संवाद साधला. इंडियन आयडॉल मराठीमधील श्वेता दांडेकर यांनी आपल्या बहारदार गायकीने मने जिंकली. कलाकार सभागृहात येताच गुलाब फुलांची उधळण आणि त्यांचे औक्षण करण्यात आले. गौरी वनारसे यांनी कार्यक्रमात जोशपूर्ण संबळ वादन केले.

महिलांनी विशेष म्हणजे नऊवारी आणि नथ, अशी मराठमोळी वेशभूषा करत सर्वांचे लक्ष वेधले. महिलांनी मंगळागौर खेळांचे अप्रतीम सादरीकरण तर केलेच. त्याशिवाय कलाकारांच्या उपस्थितीत उखाणा स्पर्धेमध्येही सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. इंडियन आयडॉल मराठीमधील श्वेता दांडेकर हिच्या दमदार आवाजाने सजलेल्या अनेक गाण्यांनी कस्तुरी सदस्या मंत्रमुग्ध झाल्या. सर्व कस्तुरींची मानाची नथ देऊन सन्मान केला. लकी ड्रॉमधून बांगड्या बक्षीस दिल्या. अभिनेत्री मेघना झुझम यांनी कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले.

सोनी मराठीवरील मालिकांमधील कलाकारांशी मनसोक्त गप्पा…पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरच्या खेळांमध्ये महिलांनी घेतलेला सहभाग अन् गप्पा, गोष्टी, गाण्यांनी बहरलेला श्रावणमेळा कार्यक्रम नुकताच पार पडला. ‘पुढारी कस्तुरी क्लब’ आणि ‘सोनी मराठी वाहिनी’तर्फे आयोजित या कार्यक्रमात महिलांनी हिरीरीने सहभाग घेतला आणि कार्यक्रमात आयोजिलेल्या स्पर्धेत प्रत्येकीने वेगवेगळे उखाणे सादर करीत दाद मिळवली. पुण्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पिंपरीमधील रामकृष्ण मोरे सभागृहात हा आगळावेगळा श्रावणमेळा कार्यक्रम रंगला. त्याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी या ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या केंद्रावरही हा कार्यक्रम रंगला आणि प्रत्येक कस्तुरी सदस्याने हा कार्यक्रम मनसोक्त एन्जॉय केला.

हेही वाचा

अपात्रतेची टांगती तलवार अन् सत्ताधार्‍यांची धाकधूक

रायगड : पेझारी येथे वीज कोसळून बापलेकाचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात संघटन मजबुतीचे भाजपसमोर आव्हान

Back to top button