कोल्हापूर जिल्ह्यात संघटन मजबुतीचे भाजपसमोर आव्हान

कोल्हापूर जिल्ह्यात संघटन मजबुतीचे भाजपसमोर आव्हान

कोल्हापूर : एकीकडे देशात लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक जागा मिळविण्याचे भाजप नेत्यांचे मनसुबे असताना दुसरीकडे मात्र कोल्हापूर जिल्ह्यात निष्ठावंत आणि नवे या वादाने अंतर्गत धुसफूस वाढली आहे. आजरा तालुक्यात पडलेल्या ठिणगीचा जिल्ह्यात वणवा पेटण्याची दाट शक्यता आहे. शिस्तीच्या समजल्या जाणार्‍या या पक्षात जाहीर वक्तव्ये होऊनही अपवाद वगळता नेत्यांनी मात्र मौन बाळगल्याचे चित्र आहे. गतविधानसभा निवणुकीत भाजपमुक्त जिल्हा झाल्याने यंदा वणवा पेटण्यापूर्वी ठिणगी विझविली नाही तर पक्षाला चांगलीच झळ बसण्याची चिन्हे आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणूक पराभवानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बेरजेचे राजकारण करून खा. धनंजय महाडिक यांना पक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढविली. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील विविध पक्षांतील नाराजांची मोट बांधून भाजप पक्षसंघटन मजबूत केले आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद निर्माण होत असतानाच पदाधिकारी निवडीवरून बंडाळीचे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. भाजपची एक स्वतंत्र विचारधारा आणि शिस्तप्रिय पक्ष अशी प्रतिमा आहे. त्यामुळेच पक्ष सत्तेत असो अथवा नसो, या विचाराशी बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात 'कमळ'फुलवत ठेवले आहे. नव्या कार्यकारिणीत संधी मिळालेल्या नव्या कार्यकर्त्यांकडून भाजपचा मूळ अजेंडा तळागाळापर्यंत रुजवला जाणार काय, असा संतप्त सवाल कार्यकर्ते विचारत आहेत.

आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बंड करून आपली नाराजी व्यक्त केली. आजरा तालुका असंतोषाचा केंद्रबिंदू ठरला असला, तरी त्याचे हादरे टप्प्याटप्प्याने जिल्हाभर बसत आहेत. गडहिंग्लज, शिरोळ, चंदगड, पन्हाळा, करवीरसह कोल्हापूर शहरातदेखील धुसफुस सुरू आहे. कोल्हापुरात झालेल्या पदाधिकारी बैठकीत नेत्यांसमोरच हा वाद उफाळून आला. अगदी गणेशोत्वातील शुभेच्छा फलकांवरील छबीपासून मित्र पक्षाच्या माजी लोकप्रतिनिधींच्या बैठकीतील उपस्थितीवरून चांगलीच खडाजंगी झाली.

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील नाराजांच्या ज्वालामुखीचा उद्रेक कधी होईल याचा नेम नाही. जिल्ह्यातील अशा निष्ठावंत नाराज कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात मेळावा घेण्याच्या तयारीत नाराजांचा एक गट आहे. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी कायम राहणार की संघटनेतील हा वाद पेल्यातील वादळ ठरणार हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेनंतर स्पष्ट होणार आहे.

महाडिक कुटुंबाभोवती जिह्यातील भाजपचे वलय आहे. खा. धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक यांना पक्षात प्रमुख स्थान आहे. खा. धनंजय महाडिक यांनी ग्रामीण कार्यकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना कार्यकर्त्यांनी किती गांभीर्याने घेतले हे आताच सांगणे धाडसाचे ठरेल. नाराजीनाट्याच्या घडामोडीमध्ये भाजपचे नेते आ. चंद्रकांत पाटील यांनी तातडीने तोडगा काढणे अपेक्षित होते. कार्यकर्त्यांची तशी धारणाही होती. मात्र, त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यांनी मौन बाळगल्यामुळे भाजपमधील अनेक जुने, जाणते कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले जाण्याची शक्यता आहे.

वाद जुनेच

भाजपमध्ये वाद जुनेच आहेत. सुरुवातीच्या काळात सुभाष वोरा विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्षाने भाजपमधील वादाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर नेत्यांतील वाद वाढतच गेले. मध्यंतरी निष्ठावंत विरुद्ध महाडिक असा अंतर्गत संघर्ष होता. भाजपची सर्वच मदार महाडिकांवरच असल्याची चर्चा थेट सुरू आहे. आता जिल्ह्यातील वादाचे लोण तालुक्यांपर्यत पोहोचले आहे. काही नेते या वादाकडे दुर्लक्ष करण्यासाठी पक्ष मोठा झाला की, भांड्यास भांडे लागून आवाज होणारच, असे खासगीत सांगत आहेत. मात्र, वाद जुनाच आहे. याकडे मात्र ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news