Ganeshotsav 2023 : बारामतीत 29 ठिकाणी कृत्रिम जलकुंड | पुढारी

Ganeshotsav 2023 : बारामतीत 29 ठिकाणी कृत्रिम जलकुंड

बारामती : पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जनासाठी बारामती नगरपरिषदेकडून 29 ठिकाणी कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्यासाठी नगरपरिषदेने 10 अधिका-यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दोन पाळ्यांमध्ये 150 हून अधिक अधिकारी-कर्मचारी विसर्जन मिरवणूक व अन्य कामे पाहणार आहेत. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ही माहिती दिली.
गणेश विसर्जन सोहळा हा पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त व्हावा यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कृत्रिम जलकुंभांची निर्मिती करण्यात आली आहे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या गणेश विसर्जनासाठी 29 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 28) पालिका अधिकारी-कर्मचारी त्यावर अहोरात्र देखरेख करणार आहेत.

संबंधित बातम्या : 

पालिकेने आवश्यक तेथे विद्युत दिव्यांची व्यवस्था केली आहे. संकलित झालेल्या गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी आठ मोठी वाहने, निर्माल्य संकलनासाठी 20 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी नऊ ते दुपारी चार व सायंकाळी पाच ते विसर्जन संपेपर्यंत दोन पाळ्यांमध्ये पालिकेचे अधिकारी-कर्मचारी काम पाहतील. त्यांच्या मदतीला विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, कार्यकर्ते, गणेशभक्त असणार आहेत. शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांनी कृत्रिम जलकुंडातच बाप्पाचे विसर्जन करत पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

इथे असतील जलकुंड
तांदूळवाडी, चिंचकर इस्टे, शिवाजीनगर जि. प. शाळा, श्रीरामनगरला कवी मोरोपंत शाळा, रुई क्षेत्रीय कार्यालय, अभिमन्यू कॉर्नर, सूर्यनगरीत मंडईशेजारी, जळोची क्षेत्रीय कार्यालय, जि. प. प्राथ. शाळा, माळवरची देवी मंदिरालगत दोन ठिकाणी, सायली हिल गणेश मंदिर, बारामती बँकेशेजारी, ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय, वीर गोगादेव मंदिराजवळ, रिंग रोड कॅनॉल पुलालगत, ढवाणवस्ती शाळा, खंडोबानगर पेट्रोलपंपालगत, जि. प. प्राथमिक शाळा शारदानगर, बालकल्याण केंद्र प्राथमिक शाळा, मुक्ती टाऊनशिप फेज 2, धों. आ. सातव शाळा जगताप मळा, शाहू हायस्कूल पाटस रोड, ख्रिश्चन कॉलनी कालव्यालगत, तीन हत्ती चौक, तुपे बंगल्यासमोर, पंचायत समितीसमोर, अशोकनगर, परकाळे बंगला, दशक्रिया विधी घाट कसबा, माता रमाई भवन.

Back to top button