Sharad Pawar : शह देण्यासाठी शरद पवारांनी निवडले चेल्याच्याच विश्वासूला | पुढारी

Sharad Pawar : शह देण्यासाठी शरद पवारांनी निवडले चेल्याच्याच विश्वासूला

संतोष वळसे पाटील

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकेकाळचे चेले आणि विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शह देण्यासाठी खुद्द शरद पवारांनी वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक, विश्वासू, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांची निवड करून त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटनेत महत्त्वाचे पद देऊन राजकीय बळ दिल्याने आंबेगावात आता राजकीय रंगत वाढल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचाविल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहायक ते मंत्री, अशी ज्यांची राज्याला ओळख आहे, असे आंबेगाव-शिरूरचे आमदार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाऊन सरकारमध्ये सामील झाले. आंबेगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाला यामुळे मोठे खिंडार पडले आहे. शरद पवार यांनी त्यांच्या जुन्या सहकार्‍यांच्या बालेकिल्ल्यात डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून दूर झालेले देवदत्त निकम यांच्यावर शरद पवार यांनी आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आंबेगावच्या राजकारणाची धार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या : 

शरद पवार यांनी निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्षपद दिल्याने वळसे पाटील आणि निकम यांची राजकीय जुगलबंदी येणार्‍या काळात पाहायला मिळू शकते. जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्याची जबाबदारी देवदत्त निकम यांच्यावर देण्यात आली आहे. आंबेगावच्या शरद पवार यांच्या सभेची जबाबदारी देवदत्त निकम यांच्या खांद्यावर त्यामुळे आली आहे. वळसे पाटील यांचा शिलेदारच त्यांच्याविरुद्ध राजकीय मैदानात पाहायला मिळतो की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

आंबेगावला गेल्या 40 वर्षात प्रचंड एवढे झुकते माप देऊनही वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली. त्यामुळे शरद पवार चांगलेच दुखावल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा पक्ष पुनर्बांधणी करण्याचे ठरविले आहे. मात्र, देवदत्त निकम ही जबाबदारी पेलवतात का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. वळसे पाटील यांची कन्या पूर्वा, पुतणे विवेक आणि प्रदीप यांनीही पक्षसंघटनेच्या वाढीकडे अधिकच लक्ष दिले आहे. तसेच मंत्री वळसे पाटील यांनीही मतदारसंघात जास्त वेळ देण्याचे ठरवून सत्तेच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून ग्रामवासीयांना खूष करण्याचे ठरविल्याचे
दिसून येते.

 

Back to top button