Girish Mahajan : बारामतीसह सर्व 48 जागा जिंकू : गिरीश महाजन | पुढारी

Girish Mahajan : बारामतीसह सर्व 48 जागा जिंकू : गिरीश महाजन

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय भाजपची केंद्रीय निवडणूक समिती घेईल. आता अजित पवार यांच्यासह त्यांचे 41 आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे बारामतीसह सर्व जागा आमची महायुती जिंकेल. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील आणि महाराष्ट्रात विरोधक पुरते क्लीन बोल्ड होतील, असा विश्वास ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मी गेल्या 30 वर्षांपासून आमदार आहे. जे अंदाज वर्तवितो ते खरे ठरतात, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या : 

बारामती विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर ते चौंडी (ता. जामखेड) येथे धनगर आरक्षणप्रश्नी उपोषणास बसलेल्यांना भेटण्यासाठी रवाना झाले. महाजन म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नी 40 दिवसांची मुदत आहे. त्यासंबंधी न्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील कमिशन काम करीत आहे. ठरलेल्या कालावधीत चौकशी पूर्ण होऊन त्यातून निश्चित मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.

पंकजाताई आमच्यासोबतच
भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, विरोधकांकडून केला जाणारा आरोप खरा नाही. विरोधकांना सध्या काही काम उरलेले नाही. त्यांनी त्यांचे लोक सांभाळावेत. आता राष्ट्रवादीत उरलेले लोक बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणी थांबायला तयार नाही. स्वतःचे सोडायचे अन् दुसर्‍याच्या मागे पळायचे, हा उद्योग विरोधक का करतात? हेच समजत नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. आम्ही आमचा पक्ष सांभाळण्यास समर्थ आहोत. पंकजाताई आमच्यासोबतच आहेत.

बावनकुळेंबाबत विपर्यास
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारासंबंधी केलेल्या विधानावर ते म्हणाले की, बावनकुळे यांच्यासह फडणवीस यांनी याप्रकरणी खुलासा केला आहे. त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. उगाच अर्थाचा अनर्थ करण्याचा हा प्रकार आहे.

Back to top button