Pune news : धनगर, ओबीसी आरक्षणासाठी रावणगावला तीन तास रास्ता रोको

Pune news : धनगर, ओबीसी आरक्षणासाठी रावणगावला तीन तास रास्ता रोको

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा :  धनगर व ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) येथे बुधवारी (दि. २७) सकाळी समाजबांधवांच्या वतीने शांततेच्या मार्गाने तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी दौंड तालुक्यातील विविध गावांतून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित होते.

ग्रामदैवत शिरसाई देवीच्या मंदिरातील पूजेनंतर मोर्चाद्वारे आंदोलनाला सुरुवात झाली. धनगर व ओबीसी आरक्षण कृती समितीचे प्रमुख पांडुरंग मेरगळ, ओबीसी आरक्षण चळवळीचे नेते महेश भागवत, भीमा-पाटसचे संचालक बाळासाहेब तोंडे पाटील, माजी संचालक लक्ष्मण रांधवण, संपत आटोळे, भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे, निवेदक अमोल धापटे, आरपीआय कार्यकर्ते नवनाथ गायकवाड, दीक्षा सांगळे, विजय गिरमे यांनी आपल्या भाषणातून धनगर व ओबीसी आरक्षणाबाबत मत मांडत सत्ताधारी मंडळींना जाब विचारला. याबाबत समाजाने जागृत होत आंदोलनाची धार तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले.

या आंदोलनात आयोजकाच्या वतीने शेळ्या-मेंढ्या सहभागी करून पारंपरिक वाद्य वाजवत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या बांधवांच्या वतीने मांडण्यात आल्या. या वेळी माजी सरपंच नितीन मेरगळ, अरुण आटोळे, नीलेश पोमणे, अजित आटोळे, हौशीराम आटोळे, संजय गाढवे, सचिन आटोळे, आप्पा भोपाळ, आबा आटोळे, सचिन हगारे, शरद आटोळे यांच्यासह हजारोच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. महसूल प्रशासनाच्या वतीने गाव तलाठी डोंगरे यांच्यासह दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे मोठ्या फौजफाट्यासह उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news