Pune ST Bus Accident : मोठा अनर्थ टळला! रिक्षाला वाचविण्याच्या नादात बस दुभाजकावर अन्.. | पुढारी

Pune ST Bus Accident : मोठा अनर्थ टळला! रिक्षाला वाचविण्याच्या नादात बस दुभाजकावर अन्..

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने, पावसापासून आडोशासाठी चिंचवड येथील सेंट मदर तेरेसा पुलाखाली काही नागरिक थांबले होते. त्याचवेळी बोरीवलीवरून पुण्याकडे जाणारी एसटी या ठिकाणाहून जाताना मध्येच रिक्षा अचानक आडवी आली; मात्र एसटीचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूस घेतली खरी; मात्र चालकाचा अंदाज चुकल्याने बस थेट रस्ता दुभाजकात घुसली. या घटनेत रस्त्यावर थांबलेले नागरिक, रिक्षाचालक यांचा जीव वाचला असून, एसटीतील प्रवासी सुखरूप आहेत.

गणेशोत्सवानिमित्त परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी ज्यादा गाड्यांची सोय केली. पाचोरा डेपोचे चालक तानाजी सरवदे हे बोरिवली ते पुणे या मार्गात सेवा बजावत होते. चिंचवड येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाताना सेंट मदर तेरेसा उड्डाण पुलाखाली आल्यानंतर एका रिक्षाचालकाने अरुंद जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अपघात होऊ नये, तसेच रिक्षाचालकाचेही नुकसान होऊ नये, म्हणून बसचालक सरवदे यांनी बस रस्ता दुभाजकाच्या बाजूस वळवली.

दरम्यान, बस दुभाजकावर आदळून अपघात झाला. या वेळी बसमध्ये 32 प्रवासी होते. प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण ठेवले. यामध्ये बसचे नुकसान झाले. मात्र सर्व प्रवासी, बसचालक आणि वाहक सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली. बसमधील प्रवाशांना दुसर्‍या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठवून देण्यात आले.

अपघातामुळे काही वेळ ग्रेडसेपरेटर बंद

दुभाजकात घुसलेल्या एसटी बसला क्रेनद्वारे काढावे लागले. ग्रेडसेपरेटरमध्ये रस्ता अरुंद असल्याने काही वेळ आकुर्डी येथील काळभोरनगर ते पिंपरी दरम्यानचा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. तसेच पाऊस सुरू असल्याने वाहतूक अगोदरच संथ सुरू होती. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी ही कोंडी काही वेळात सोडवून वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा

पिंपरी शहरातील विसर्जन घाट सज्ज

World Tourism Day : पर्यटन दिनानिमित्त आयआरसीटीसीची विमान तिकिटावर विशेष ऑफर

पिंपरी : पालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल

Back to top button