पिंपरी : पालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील विविध इमारतींच्या गच्चीवर सौर ऊर्जा पॅनेल बसविण्यात येणार आहेत. तसेच, भोसरी स्मशानभूमीच्या विद्युतदाहिनीतील हवा योग्य ठेवण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासह विविध कामांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.26) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली.

सभा पालिकेच्या मधुकर पवळे सभागृहात झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच, विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या शहरातील विविध इमारतींवर रुफ टॉप सोलर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील इमारतीसाठी 33 लाख 63 हजार 791 इतका खर्च आहे. ते काम इलेक्ट्रो मॅकेनिकल्स या ठेकेदाराला देण्यात आले आहे.

भोसरी स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनी, प्रदूषित हवा नियंत्रण यंत्रणा व विविध विद्युत संच मांडणी यांची वार्षिक पद्धतीने चालन, देखभाल व दुरुस्तीचे काम शिल्पा इलेक्ट्रिकल्स अ‍ॅण्ड कंपनीच्या ठेकेदारास दिले आहे. तीन वर्षांसाठी 2 कोटी 10 लाख इतका खर्च आहे.
महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील दहावी परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणार्‍या विद्यार्थिनीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. वैद्यकीय विभागातील इतर रुग्णालयाकरिता आवश्यक ओटी टेबल खरेदी करण्यात येणार आहेत. संतपीठ विद्यालयासाठी लहान बाके आणि क्रीडा विभागाकडून शहर शालेय क्रीडा स्पर्धेसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. फ प्रभाग आणि ह प्रभागअंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास मान्यता देण्यात आली.

29.60 टक्के कमी दराने काम

कासारवाडी रेल्वे स्थानकामागील नाशिक फाटा सेक्टर क्रमांक 502 ते सेक्टर क्रमांक 496 पर्यंत पवना नदीलगत शंकर मंदिर ते पिंपळे गुरव पुलापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्यावरून उंच व अजवड वाहनांना भुयारी मार्गातून ये-जा करता येत नाही. या कामासाठी स्थापत्य ह मुख्यालयाने 23 कोटी 40 लाख खर्चाची निविदा राबविली होती. त्यासाठी 7 ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. एच. सी. कटारिया या ठेकेदाराची तब्बल 28.60 टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली. हे काम 16 कोटी 93 लाख 10 हजार खर्चात करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

हेही वाचा

Pune PMPML News : संचलन तूट कमी करण्यासाठी इतर पर्याय शोधा

पिंपरी : उमेदवाराचा अर्ज फाडल्याप्रकरणी गुन्हा

Pune Crime : गणेशोत्सवात झारखंडच्या टोळीने चोरले 52 मोबाईल; 16 लाखांचे मोबाईल जप्त

Back to top button