पिंपरी शहरातील विसर्जन घाट सज्ज | पुढारी

पिंपरी शहरातील विसर्जन घाट सज्ज

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरात सध्या गणेशोत्सवामुळे भक्तीमय वातावरण आहे. विविध मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी सायंकाळपासून गर्दी होत आहे. लाडक्या गणरायांचे बुधवारी (दि.27) आणि गुरुवारी (दि.28) वाजतगाजत विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील विसर्जन घाट सज्ज आहेत. गणेश मंडळांसाठी तसेच, नागरिकांसाठी तेथे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकांसह जीवरक्षक, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षापथक नेमण्यात आले आहेत.

काळेवाडी, निगडी प्राधिकरण, चिखली, पिंपळे गुरव, वाकड, मोशी, थेरगाव पूल, वाल्हेकरवाडी, पिंपरी कॅम्पातील सुभाषनगर, सांगवी या विसर्जन घाटावर वैद्यकीय साहित्य, औषधे आणि रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, ब्रदर, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका, वाहनचालक, सफाई कामगार आदींचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या नवव्या दिवशी बुधवार (दि.27) आणि दहाव्या दिवशी गुरुवार (दि.28) घाटांवर वैद्यकीय पथके असणार आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

घाटावर स्वयंसेवी संघटनांकडन गणेशमूर्ती संकलन केले जात आहे. महापालिकेच्या वतीने घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. तसेच, निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील 26 विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात ठेवण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फतही कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. घाटांवर आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा

पिंपरी : पालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल

पिंपरी : उमेदवाराचा अर्ज फाडल्याप्रकरणी गुन्हा

Pimpri News : प्रतिदिन सरासरी 5 विदेशी पाहुणे पिंपरी शहरात

Back to top button