Jayant Patil : शरद पवार, गौतम अदानी यांच्या भेटीत गैर काय? : जयंत पाटील | पुढारी

Jayant Patil : शरद पवार, गौतम अदानी यांच्या भेटीत गैर काय? : जयंत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीत गैर काय? असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यामध्ये पक्षाच्या जिल्हा पदाधिकार्‍यांच्या रविवारी झालेल्या पदवाटप कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. पाटील म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी यांनी नवा उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या उद्घाटनाला शरद पवार गेले यात गैर काय आहे.

संबंधित बातम्या : 

तो प्रकल्प काही आपल्या राज्यातून गेलेला नाही. त्यांना नवा प्रकल्प शरद पवार यांना दाखवायचा असेल. शरद पवार इंडिया आघाडीमध्ये सध्या आहेत. त्यात काही शंका घेऊ नये. शरद पवार-प्रफुल्ल पटेलांचा फोटोवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, संसदेचे अधिवेशन असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नसेल म्हणून काढला असेल. दुष्काळावर सरकार हालचाल करत नाही. फक्त घोषणाच होतील. कार्यवाही होणार नाही, असं सध्या दिसत आहे. सरकारकडून कुठलीच नियोजनाची बैठक झाली नाही. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल आहे. सरकार भूमिका व्यक्त करत नाही. सरकार निवडणुकीत गुंतल्याची टीका पाटील यांनी केली.

अजित पवार यांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. यावर येत्या निवडणुकीत बारामतीतून कुणाला उमेदवारी दिली जाणार? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? या पत्रकारांच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराबाबत सांगू शकतो. कोण कुणाला तिकीट देईल हे माहिती नाही. पण राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेच 2024 ची निवडणूक लढवतील. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन कुठून कोण लढेल हे ठरवू.

या पदाधिकार्‍यांची केली निवड
बारामती लोकसभा कार्याध्यक्ष – महादेव कोंढरे, शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष – देवदत्त निकम, हवेली तालुका अध्यक्ष – संदीप गोते, जिल्हा उपाध्यक्ष – राम टुले, सुदाम इंगळे, अनंतराव चौगुले, बाळासाहेब नरके, जिल्हा सरचिटणीस – शब्बीर पठाण, जिल्हा सरचिटणीस – दत्ता चव्हाण, पुरंदर तालुका कार्याध्यक्ष बंडू जगताप

लोकशाहीत पोस्टर कुणीही लावू शकतो
भावी मुख्यमंत्री म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे बॅनर लागले आहेत. यावर जयंत पाटील म्हणाले, लोकशाहीत पोस्टर कुणीही लावू शकते. समर्थक कुणाला कुठेही नेऊन बसवतात. शरद पवार यांच्याकडे जे नेते आहेत, त्यांच्यापैकी अनेकांमध्ये मुख्यमंत्रीपदाची क्षमता आहे. त्यामुळे अनेकांचे फ्लेक्स लागतात.

Back to top button