

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असली; तरी आम्ही वास्तववादी आहोत, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी दिली. दादा मुख्यमंत्री व्हावेत, असे गणपती बाप्पाकडे मागणे घातले आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. खासदार सुनील तटकरे यांनी शहरातील प्रमुख गणपतींचे दर्शन घेतले, त्या वेळी ते अखिल मंडई गणपती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मंडईचा गणपती हा कष्टकर्यांचा असून, महाराष्ट्राला गतिमान करण्याचे मागणे मागितले आहे. राज्यात काही भागांत दुष्काळ, तर काही भागांत अतिवृष्टी झाली आहे. महाराष्ट्र गतिमान व्हावा, हे साकडं घातले आहे. पक्षासाठी बाप्पाला काही मागण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
संबंधित बातम्या :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांचा आरोप केला होता. तोच धागा पकडून खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत अजित पवार यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर बोलताना तटकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी तशी वक्तव्ये 2014 च्या निवडणूक प्रचारात केली होती. तपास यंत्रणेने केलेल्या तपासात अजित पवार दोषी आढळत नाहीत, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? यावर निवडणूक आयोग गुणवत्तेवर निर्णय देईल. 6 तारखेला किती आमदार आणि खासदार आमच्यासोबत आहेत, हे समजेल; त्यावर आता बोलण्यात काही अर्थ नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत किती व कोणत्या जागा लढवायच्या ते महायुतीतील नेते एकत्र बसून ठरवतील. बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणी लढायचे, हे अजित पवार ठरवतील, असेही तटकरे म्हणाले.