

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतमाता की जय… वंदे मातरमच्या घोषणेने दुमदुमून गेलेला परिसर… जवानांवर केलेली पुष्पवृष्टी… अशा देशभक्तीने भारवलेल्या वातावरणात सद्भावना रॅली काढण्यात आली. शहराच्या पूर्वभागात हिंदू- मुस्लिम गणेशभक्तांनी एकत्र येत दिव्यांग जवानांसमवेत राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश देत सद्भावना रॅली काढली. देशसेवा करताना दिव्यांगत्व आलेल्या जवानांप्रती या वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळ ट्रस्ट आणि खडक पोलिस स्टेशनतर्फे रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, कर्नल वसंत बल्लेवार, क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्युट खडकीचे कॅप्टन डॉ. चंद्रशेखर चितळे, शिरीष मोहिते, आनंद सराफ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने, पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, सह पोलिस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
नबीसाब नदाफ, जितेंद्र कुमार, प्रवेश कुमार तिवारी, गणेशाचार्य प्रकाश, रीता कटरे, हरिओम, प्रवीण कुमार मिश्रा, सादिक अरुण कुमार, उमाकांत भोसले आदींचा सन्मान या वेळी करण्यात आला. गणेशभक्तांनी दिव्यांग जवान आणि पोलिसांसोबत देशभक्ती व हिंदू – मुस्लिम एकतेचा नारा दिला. शहराच्या पूर्वभागातील चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली
उधळण आणि भारतमातेचा जयघोष करण्यात आला. संदीपसिंह गिल म्हणाले, कार्यक्रम 22 वर्षे चालू आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. देश गणेशोत्सवात व्यग्र असताना एकोप्याचा चांगला संदेश जात आहे. समाजामध्ये तणाव निर्माण होऊ नये आणि आपण एक आहोत, ही भावना निर्माण होत आहे. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.