पिंपरी : शस्त्र बाळगणार्‍या तडीपारांना बेड्या | पुढारी

पिंपरी : शस्त्र बाळगणार्‍या तडीपारांना बेड्या

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घातक शस्त्र बाळगणार्‍या तीन तडीपार गुंडांच्या मुसक्या गुंडाविरोधी पथकाने आवळल्या. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार राबविलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक हरिश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आबा दाखले (25, रा. निसर्ग कॉलनी, रहाटणी) याला 7 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील कोणत्याही परवानगीशिवाय तो शहरात आला होता. तसेच, परिसरात दहशत पसरविण्यासाठी देखील दाखले शस्त्र बाळगत होता. याबाबत पोलिस अंमलदार रामदास मोहिते यांना माहिती मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक सत्तूर मिळून आला आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. दीपक दाखले याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. अमित गजानन वानरे (32, रा. आदर्शनगर, किवळे, देहूरोड) याला 12 जुलै 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे.

मात्र, तरी देखील शासनाची कोणतीही परवानगी न घेता तो शहरात आला होता. याबाबत गुंडाविरोधी पथकातील पोलिस अंमलदार शुभम कदम यांना माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी अमित वानरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. अमित वानरे याच्या विरोधात सन 2015 पासून देहूरोड, खडकी, चिंचवड, तासगाव, चाकण, निगडी, पिंपरी, रावेत पोलिस ठाण्यात एकूण 12 गुन्ह्यांची नोंद आहे.

समीर बोडकेला घेतले ताब्यात

मावळ परिसरातील सराईत गुन्हेगार समीर ऊर्फ सोन्या जालिंदर बोडके (28, रा. गहुंजे गाव, ता. मावळ) याला 2 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. मात्र, तो देखील बेकायदेशीरपणे जिल्ह्याच्या हद्दीत वावरत होता. याबाबत गुंडाविरोधी पथकातील पोलिस अंमलदार गणेश मेदगे यांना माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करीत समीर बोडके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सत्तूर जप्त केले आहे. समीर याच्या विरोधात सन 2014 पासून तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.

सराईतांचे धाबे दणाणले

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची मुस्कटदाबी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, गुंडाविरोधी पथकाने राबविलेल्या मोहिमेत सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाच्या या कारवाईमुळे सराइतांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

हेही वाचा

Pimpri News : डेक्वन क्विनमध्ये हृदयविकाराने प्रवाशाचा मृत्यू

निसर्ग : पर्यावरणपूरक उत्सवाची चळवळ

पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आणखी 5000 रिक्षा

Back to top button