पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आणखी 5000 रिक्षा | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आणखी 5000 रिक्षा

राहुल हातोले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणखी पाच हजार रिक्षा धावणार आहेत. शहरातील आरटीओ कार्यालयाच्या वतीने यंदा पहिल्या आठ महिन्यांत 5 हजार 667 रिक्षाचालकांना परमीटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.

विनाथांबा रिक्षांचा नागरिकांना त्रास

चौकाचौकात चालकांनी रिक्षा स्टँड उभारले आहेत. ठरवून दिलेल्या जागेतच या रिक्षा थांबतात. ठरविलेल्या मार्गात सेवा देतात. मात्र, खासगी अ‍ॅपवर धावणार्‍या रिक्षांचा कुठलाच थांबा नसतो. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी या रिक्षा पार्क केल्या जातात. परिणामी बर्‍याचदा वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. पर्यायाने, शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. त्यावर तोडगा आवश्यक आहे. मात्र परमीटचे वाटप आरटीओकडून अद्यापही सुरूच आहे.

शहरातील नागरिक खासगी वाहनांचा ज्या प्रमाणात वापर करीत आहेत, त्याहून अधिक संख्येने सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करणारे नागरिक आहेत. सार्वजनिक वाहनांमध्ये महापालिकेच्या बस, ओला, उबेर आणि रिक्षा आदी वाहनांचा समावेश होतो. शहरात सार्वाजनिक वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 2017 पासून रिक्षा परवाना वाटप खुला करण्यात आल्याने मागेल त्याला अटींची पूर्तता करून परमीट दिले जात आहे.

मात्र यामुळे शहरात वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. आरटीओकडून होणार्या सर्रास परमीट वाटपास शहरातील रिक्षा संघटनांकडून विरोध होत आहे. दरम्यान, चालू वर्षी एकूण 5 हजार 667 रिक्षाचालकांना परमिटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये मे, जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक परमीटचे वाटप झाले आहे.

रिक्षा संघटनांचा विरोध

शहरात पीएमपी, लोकल आणि आता मेट्रोद्वारे नागरिकांना सक्षम सार्वजनिक सेवा मिळत आहे. त्यामुळे बर्‍याच रिक्षाचालकांचा दिवस भरणेदेखील अवघड होऊन बसले आहे. रिक्षाच्या कर्जाचे हप्तेही थकले आहेत. त्यामध्ये आरटीओकडून परमीट वाटप सुरू असल्याने शहरातील रिक्षांमध्ये आणखी भर पडत आहे. त्यामुळे रिक्षांचे परमीट थांबवावे, अशी मागणी अनेक संघटनांकडून होत आहे.

रिक्षाचालकांना परमीटचे वाटप (वर्ष 2023)
जानेवारी : 422
फेब्रुवारी : 590
मार्च : 547
एप्रिल : 437
मे : 1009
जून : 1004
जुलै : 990
ऑगस्ट : 668
एकूण : 5667

शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे स्पर्धा वाढल्याने आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराची लोकसंख्या आणि रिक्षांचे वाढते प्रमाण यामध्ये समतोल साधणे आवश्यक आहे. त्यानुसार आरटीओने परमीटचे वाटप करावे. अन्यथा हे परमीट देणे थांबवावे.

– संतोष उबाळे,
अध्यक्ष, वाट बघतोय रिक्षावाला संघटना,
पिंपरी चिंचवड शहर.

हेही वाचा

पिंपरी : मालमत्ता सर्वेक्षणासाठी ’महापालिका आपल्या दारी’

समाजभान : समाजाच्या पुनर्रचनेसाठी सत्यशोधक चळवळ

९५ दशलक्ष पाकिस्तानी दारिद्र्यरेषेखाली!

Back to top button