निसर्ग : पर्यावरणपूरक उत्सवाची चळवळ | पुढारी

निसर्ग : पर्यावरणपूरक उत्सवाची चळवळ

नीलेश बने

गणेशोत्सव पर्यावरणपूरक करणे हे मोठं आव्हान आहे. गणेशमूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक करणं, हे त्याचं पहिलं पाऊल आहे. त्यासाठी लोकांनी पुढे येऊन विज्ञान, पर्यावरण समजून घ्यायला हवं. त्यानुसार आपल्या धार्मिक धारणांमध्ये बदल करायला हवेत.

पावसाळ्यात निसर्गानं सर्वत्र हिरवीगार उधळण केलेली असताना, निसर्गातील दुर्वा-फुलांनी त्याच निसर्गातील मातीच्या गणपतीची पूजा करणं म्हणजे गणेशोत्सव. त्यातही खरं तर ही गौराईची पूजा. गौराई म्हणजे ही खरं तर पृथ्वीचीच पूजा. म्हणून कुठं खड्याच्या गौरी, तर कुठं तेरड्याच्या. पण शेवटी हा उत्सव म्हणजे निसर्गाबद्दलच्या कृतज्ञतेचा उत्सव.

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यातील चैतन्याला सगुण रूप देऊन घरी आणायचं. जमेल तशी त्याची पूजा करायची आणि पुन्हा हे सगळं निसर्गातच अर्पण करायचं. पण सध्या आपण तसं करतोय का, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. गणेशमूर्ती पार्थिव असावी, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वीतत्त्वापासून बनलेली. माती हा पृथ्वीवरील सृजनशील भाग. मातीतून सगळं उगवतं आणि पुन्हा त्याची मातीच होते. निसर्गाच्या या चक्राचं महत्त्व कळावं, यासाठीच गणेशमूर्ती पार्थिव असावी अशी या उत्सवाची संकल्पना. पण आता बाजारात मिळते ती गणेशमूर्ती एकतर शाडू मातीची असते किंवा पीओपीची. शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक आणि पीओपी पर्यावरणास घातक, अशी मांडणी गेली कित्येक वर्षे केली जात आहे. पण वैज्ञानिक कसोट्या वापरून पाहिलं, तर शाडू माती आणि पीओपी हे दोन्हीही पर्यावरणाला घातक आहेत. पुण्यातील काही नागरिकांनी ‘पुनरावर्तन’ नावानं गणेशमूर्तींबद्दल जागृती करण्याची मोहीम सुरू केलीय. त्यातील ‘जीवित नदी’ या संस्थेच्या शैलजा देशपांडे यांनी यावर संशोधनपर लेखनही केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे नैसर्गिक नाही असं सांगितलं जातं. पण ते चुकीचं आहे. पीओपी हेदेखील नैसर्गिकरित्याच बनतं. गणेशमूर्तीसाठी वापरली जाणारी शाडू माती ही साधारणतः गुजरातवरून आणली जाणारी चिकणमाती असते. ही दोन्हीही माध्यमे नदीत, तलावात किंवा समुद्रात साचून पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्यामुळेच विसर्जनाचे नवे पर्याय स्वीकारायला हवेत.

गणेशमूर्तींबद्दल असं काही सांगितलं की, लोक लगेच विचारतात, पूर्वीपासून गणेशोत्सव होतोय तेव्हा नाही का झाली पर्यावरणाची हानी? खरं तर गेल्या काही वर्षांत वाढलेल्या गणेशमूर्तींची संख्या पाहिली तरी याचं उत्तर मिळतं. पण त्यातूनही आणखी एक उत्तर म्हणजे, पूर्वी गावातल्या शेतातील किंवा नदी किनार्‍यावरील मातीपासून गणेशमूर्ती बनविली जायची. नैसर्गिक रंगांनी रंगविली जायची.
अशा तिथल्या मातीनं बनलेल्या गावातल्या गणेशमूर्ती तिथल्या नदीपात्रात किंवा जलस्रोतात विरघळून जायच्या आणि निसर्गचक्र पूर्ण

व्हायचं. पण गणेशोत्सवाचं स्वरूपच बदलल्यानं, आता सगळं व्यावसायिक झालंय. त्यामुळे आता गावातील कुंभारही शाडू माती किंवा पीओपी वापरतात. जी तिथल्या जलस्रोतांमध्ये साचून राहते. त्यामुळे तिथल्या माशांची, पाण्यातील वनस्पतींची त्यामुळे अपरिमित हानी होते. त्यातील घातक रंगांतील रसायनांमुळे प्रदूषित पाणी पुन्हा आपल्या अन्नसाखळीतही येतं.

आपण साधी गणपतीच्या जन्माची गोष्टही विसरून गेलोय. गणपती हा पार्वतीनं आपल्या मळापासून तयार केला आणि त्यात प्राण फुंकले, अशी परंपरेतील गोष्ट आहे. पार्वती म्हणजे धरती आणि तिच्या मळातून म्हणजे चिखलातून किंवा मातीतून बनलेला गणपती. म्हणून गावातल्या मातीचा गणपती बनवून त्याची पूजा करणं आणि ती माती पुन्हा निसर्गात जायला हवी.

पण हे शास्त्र विसरून आपण मात्र त्याचा सातत्यानं अपमान करतोय. ज्या पाण्यात आपण गणेशमूर्ती विसर्जित करतो, ते पाणी एवढं दूषित असतं की, ते आपण वापरूही शकत नाही. अशा पाण्यात आपण एवढे दिवस पूजा केलेल्या गणेशमूर्तीचं विसर्जन करणं, हे कसं चुकीचं आहे हे लोकांना पटवून द्ययला हवं. त्यामुळेच गणेशमूर्ती आणि त्याच्या विसर्जनाबद्दल जागृती आवश्यक आहे.

गणेशमूर्ती शाडू मातीची असो किंवा पीओपीची, ती जलस्रोतांमध्ये जाऊन लगेच विरघळत नाही. शाडू मातीची मूर्ती विरघळल्यानंतरही तिची चिकट माती जलस्रोतांमधील नैसर्गिक छिद्रांमध्ये अडकून बसते. खरं तर शास्त्रानुसार गणेशमूर्तीवर अक्षता सोडून ‘पुनरागमनाय च’ किंवा ‘पुढल्या वर्षी लवकर या’ असं म्हणून मूर्ती हलविल्यानंतर तिच्यातील प्रतिष्ठापित देवत्वाचं विसर्जन होतं, असं म्हटलं आहे. तरीही आपण जी गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेतो, त्यात आपल्या श्रद्धा गुंतलेल्या असतात. गणेश विसर्जनाच्या वेळी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक जण ओक्साबोक्शी रडतात. त्यामुळे लोकांच्या श्रद्धा समजून घ्यायला हव्यात. गणेश विसर्जनाचे पर्याय हे सोपे आणि आपलेसे करावे, असे असायला हवेत. तीन वेळा पाण्यात मूर्ती बुडविल्याने अनेकांना गणेश विसर्जनाचे समाधान मिळते. त्यामुळे गणेशमूर्ती कृत्रिम कुंडात तीन वेळा बुडवावी आणि नंतर ती तेथील कार्यकर्त्यांकडे सोपवावी. हल्ली विसर्जन कुंडातच स्वयंसेवक असतात. तेही अशा पद्धतीने विसर्जित मूर्ती पुन्हा एकत्र करून पुनर्वापरासाठी पाठवू शकतात.

Back to top button