

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्मार्टफोन दिवसेंदिवस स्मार्ट होत आहेत, तर दुसरीकडे सातत्याने नवीन फोन घेणार्यांची संख्याही वाढत आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक; पण जुन्या मोबाईलची बाजारपेठही वेगाने वाढत आहे. जुन्या बाजारात विकण्यासाठी आलेला मोबाईल चोरीचा अथवा गुन्ह्यात वापरलेलाही असू शकतो? असा मोबाईल घेतल्यास विनाकारण एखाद्या अडचणीत सापडण्याचा धोका आहे. त्यामुळे सेकंडहँड मोबाईल खेरीदी करण्यापूर्वी त्याचा आयएमईआय क्रमांक तपासावा, असे आवाहन डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि पोलिसांकडूनही करण्यात आले आहे.
देशातील व्यक्तीची ओळख व्हावी, यासाठी आधार कार्ड आपण काढतो. तसेच, जगात उत्पादित होणार्या मोबाईललाही त्याचा स्वतःचा युनिक क्रमांक दिला जातो. त्याला इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) क्रमांक म्हटले जाते. सणांच्या काळामध्ये केवळ नवीनच नव्हे, तर जुन्या वस्तूंची खरेदीही वाढते. मोबाईल हा आकर्षणाचा बिंदू आहे. फोनवरील संभाषणापेक्षा मोबाईलचा वापर मनोरंजनासाठी अधिक होऊ लागला आहे.
मात्र, चुकीचा सेकंडहँड मोबाईल आपण घेतल्यास त्यामुळे आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मोबाईल खरेदीचे पैसे तर जातीलच; शिवाय पोलिस ठाण्याची पायरीही चढावी लागू शकते. सेकंडहँड मोबाईल विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी आयएमईआय क्रमांक तपासा. संबंधित मोबाईल चोरलेला नाही ना? याची खात्री करा. सेकंडहँड मोबाईल विक्रेत्याकडून आपण बिलावर आयएमईआय क्रमांक नोंदविण्याचा आग्रह धरा, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी आणि दूरसंचार विभागाने केले आहे.
दूरसंचार विभागाने (डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन) हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल ब्लॉक करण्याची सुविधा दिली आहे. तसेच, ब्लॉक मोबाईल त्यावर शोधता येतील. म्हणजे सेकंडहँड मोबाईल खरेदी करताना त्याची माहिती उपलब्ध होईल. दूरसंचार विभागाच्या www.ceir.gov.in या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध होईल.
तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमधील नॅव्हिगेशनमध्येही मोबाईलचा आयएमईआय क्रमांक मिळू शकतो. दोन सिम असणार्या मोबाईलमध्ये दोन आयएमईआय क्रमांक असतात. तसेच, मोबाईलवर *#06# असे क्रमांक डायल केल्यावरही आपल्याला मोबाईलचा आयएमईआय क्रमांक मिळतो.
हेही वाचा