खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या मालमत्ता जप्त! | पुढारी

खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या मालमत्ता जप्त!

अमृतसर/चंदीगड : वृत्तसंस्था कुख्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याचा चंदीगडमधील सेक्टर सी-15 मधील बंगला जप्त करण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तशी नोटीस बंगल्यावर शनिवारी लावली. पन्नू हा प्रतिबंधित शीख फॉर जस्टिस या दहशतवादी टोळीचा म्होरक्या आहे. तो कॅनडा, अमेरिका आदी देशांतून भारतविरोधी प्रपोगंडा चालवत असतो. निज्जर हत्येवरून उद्भवलेल्या कॅनडा- भारत वादात पन्नूने कॅनडात राहत असलेल्या हिंदूंना कॅनडा सोडण्याची उघड धमकी दिली होती. अमृतसरलगतच्या खानकोट या पैतृक गावातील पन्नूची मालमत्ता (शेती) जप्त करण्यात आली आहे. आता पन्नू या मालमत्तांचा कायदेशीर मालक उरलेला नाही. या आता सरकारी मालमत्ता झाल्या आहेत.

पन्नू याला 2020 मध्ये दहशतवादी घोषित करण्यात आले होते. तत्पूर्वी, 2019 मध्ये भारत सरकारने यूएपीएअंतर्गत पन्नूच्या शीख फॉर जस्टिस या टोळीवरही बंदी घातली होती. दहशतवादाला प्रोत्साहन देणे, युवकांची दिशाभूल करून त्यांना शस्त्रे उचलण्यास प्रवृत्त करणे तसेच फुटीरवादी म्हणून पन्नूला सरकारने दहशतवादीही जाहीर केले होते. शीख फॉर जस्टिसचे 40 वर वेबपेजेस, यू-ट्यूब चॅनल्सवरही बंदी घातली होती.

मृत दहशतवादी निज्जरच्यामालमत्तेवरही जप्तीची नोटीस

एनआयए मोहाली न्यायालयाच्या आदेशावरून कॅनडात मारला गेलेला कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या जालंदर जिल्ह्यातील भारसिंगपुरा गावातील घरावर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे.

Back to top button