मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी अमित शहा यांची खलबते | पुढारी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी अमित शहा यांची खलबते

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सोमवारी विधानसभा अध्यक्षांसमोर होऊ घातलेली शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आणि लोकसभा निवडणुकांचे वाजू लागलेले पडघम अशा पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुप्त खलबते केली.

फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे कळते. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊण तास चाललेल्या या बैठकीत अमित शहांनी प्रदेश भाजपला दिलेले लोकसभेचे टार्गेट जवळजवळ बदलले. भाजपने आधी राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे मिशन हाती घेतले होते. हे मिशन 45 ठरलेले असले तरी प्रदेश भाजपने सर्व 48 लोकसभा मतदारसंघांवर फोकस करण्याचे आदेश शहांनी या बैठकीत दिले. त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना युतीमधून बाहेर पडल्यानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल. मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत असून आता अजित पवार यांचा राष्ट्रवादीमधील मोठा गटही भाजपला जाऊन मिळाला आहे. असे असले तरी महाराष्ट्राचे लोकसभेचे मैदान भाजप श्रेष्ठींना अजूनही सुरक्षित वाटत नाही. मराठा आरक्षणाचा पेच आणि त्यात आता ओबीसी व धनगर समाजाच्या आक्रमक भूमिकेची पडलेली भर यांमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे रंग बदलू लागली आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार किती ठिकाणी विजयी होतील, याचा अंदाज अमित शहा यांनी या बैठकीत घेतला.

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणी एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यातून निर्माण होणार्‍या परिस्थितीमधून कसा मार्ग काढावा, याबद्दलही अमित शहांनी शिंदे व फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

अजित पवारांची गैरहजेरी

अमित शहा मुंबई दौर्‍यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अनुपस्थित होते. विमानतळावर शहांच्या स्वागताला उपस्थित मंत्र्यांमध्ये ते दिसले नाहीत. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीलाही ते गैरहजर होते. त्यांच्या या अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. परंतु, पवार हे आपल्या नियोजित शासकीय कार्यक्रमासाठी बारामती येथे उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button