पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील मालमत्ताधारकांसाठी कर संकलन विभागाच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अंतर्गत शनिवारी (दि. 23) सकाळी 11.30 वाजता करसंवाद सभा होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युपिक आयडी, मालमत्ता सर्वेक्षण, करांमधील सवलत याबद्दल माहिती देण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणार्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी कर संवादाचे आयोजन करण्यात येते. हा संवाद फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून होणार आहे. ज्यांना ऑनलाईन उपस्थित राहता येणार नाही, अशा नागरिकांनी महापालिकेमधील कर संकलन विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे.
या करसंवादमध्ये मालमत्ता सर्वेक्षणाची व मालमत्तांना युपिक आयडी आदीची माहिती देण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व सेवा तसेच, शासनाचे इतर विभाग यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी या युपिक आयडीचा वापर केला जाणार आहे. याचा नागरिकांना कसा फायदा होणार आहे, याबाबत सर्व माहिती देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना उपस्थित राहणे शक्य नसेल असे नागरिक फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारु शकतात. या प्रश्नाची उत्तरे करसंवादमध्ये देण्यात येतील.
मालमत्ताधारकांना कर भरताना काही अडचणी असल्यास त्या अडचणींचा करसंवादमध्ये तत्काळ निपटारा करण्यात येत आहे. या करसंवादाला मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या करसंवादामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
हेही वाचा