बाॅडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाईन औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्यावर छापा | पुढारी

बाॅडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाईन औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्यावर छापा

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बाॅडी बिल्डींगसाठी तरुणांकडून इंजेक्शनद्वारे सर्रासपणे घेतल्या जाणाया मेफेनटरमाईन औषधांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या अविनाश शिवाजी शिंदे (रा. पिंपळी, ता. बारामती) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून १२ इंजेक्शन्स औषध बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अक्षय सिताप यांनी फिर्याद दिली.

पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांना यासंबंधीची माहिती मिळाली होती. त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी (दि. १९) पथकाने यासंबंधीची माहिती मिळवली. त्यावेळी अविनास शिंदे हा गुणवडी गावच्या हद्दीत जळोची रस्ता येथे या इंजेक्शनचा साठा बाळगून असल्याचे पथकाला समजले. या इंजेक्शनची डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करणे बंधनकारक आहे. पोलिस पथकाने तेथे छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. औषध निरीक्षकांना यासंबंधीची कल्पना देण्यात आली. परंतु ते मुंबईत असल्याने त्यांनी पोलिसांना जप्तीची कारवाई करावी अशी परवानगी दिली.

संबंधित बातम्या : 

त्यानुसार पोलिसांनी तीन बनावट ग्राहक तयार केले. त्यांना यासंबंधीची कल्पना दिली. शिंदे याला देण्यासाठी बनावट नोटा देण्यात आल्या. गुणवडी-जळोची रस्त्याने हे पथक जात असताना एका पान शाॅपजवळ शिंदे थांबलेला दिसला. बनावट ग्राहकाने त्याच्याकडे जात इंजेक्शनसाठी औषधाची मागणी केली. तो ते देत असताना खासगी वाहनातून आलेल्या पोलिसांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जावू लागला. परंतु त्याचा पाठलाग करत पकडण्यात आले. त्याच्या खिशामध्ये चार सिलबंद इंजेक्शन औषध बाटल्या मिळून आल्या. दुचाकीच्या टूल बाॅक्समध्ये त्याने आठ औषध बाटल्या ठेवल्या होत्या.

पंचांसमक्ष त्या जप्त करण्यात आल्या. ५०० रुपयाला एक याप्रमाणे या औषधांची इंजेक्शनसाठी त्याच्याकडून विक्री केली जात होती. डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय हे औषध दिले जावू शकत नाही. जीममध्ये बाॅडी बिल्डींगसाठी काही तरुण त्याचा वापर करतात. परंतु ते स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक समजले जाते. त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणी पुढील कार्य़वाही केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button