Pune Crime News : चोरीसाठी सोलापूर ते पुणे व्हाया अकलूज! 17 तोळे सोने जप्त, 7 गुन्ह्यांचा छडा | पुढारी

Pune Crime News : चोरीसाठी सोलापूर ते पुणे व्हाया अकलूज! 17 तोळे सोने जप्त, 7 गुन्ह्यांचा छडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गर्दीचा फायदा घेत स्वारगेट बसस्थानक परिसरात चोर्‍या करणार्‍या महिलेला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने अटक केली. महिलेकडून आठ लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे तब्बल 17 तोळे दागिने जप्त करण्यात आले असून, सात गुन्हे उघडकीस आले आहेत. संबंधित महिला ही सोलापूरहून पुण्यात चोर्‍या करण्यासाठी येत असल्याचे तपासात समोर आले आहे. हेमा अर्जुन शिंदे (25, रा. अकलूज, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. स्वारगेट बसस्थानक परिसरात बुधवारी (दि.20) गर्दीचा गैरफायदा घेत सोन्याचे दागिने असलेली महिलेची पर्स हिसकविण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर होते. या दरम्यान स्वारगेट एसटी स्टॅण्ड भागात एक महिला संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती अंमलदार सुजय पवार, संदीप घुले यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकाने सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने चोरी केल्याची कबुली दिली. संबंधित महिलेला पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता तिने स्वारगेट भागातून यापूर्वीदेखील चोर्‍या केल्या असून, सोन्याचे दागिने सोलापुरातील एका सोनाराला विकल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सोलापूर येथून दागिने जप्त केले आहेत.

महिलेकडून एकूण 8 लाख 50 हजारांचे 17 तोळे दागिने जप्त केले आहेत. तर, 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. संबंधित महिला ही सोलापूर येथील रहिवासी असून, चोर्‍या करण्यासाठी ती बसने पुण्यात येत होती, असे तपासात समोर आले आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारू, शिवा गायकवाड, फिरोज शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

Pune Crime News : आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री; दलालांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime : आता पुण्यातही वाजणार छमछम? मद्यधुंद रात्रीला विदेशी ललनांची मैफल

नाशिक : बेशिस्त पार्किंगवर टोईंगची मात्रा ; मनपा व पोलिस प्रशासनाचा संयुक्त निर्णय

Back to top button