पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने ऑक्टोंबर महिन्यासाठी सुमारे 13 लाख टन साखरेचा आगाऊ कोटा गुरुवारी (दि.21) खुला करीत लगेचच साखर विक्रीस कारखान्यांना मुभा दिलेली आहे. सप्टेंबरसाठी केंद्राने 25 लाख टनांचा कोटा खुला करुनही साखरेचे दर अपेक्षित प्रमाणात कमी होत नसल्याने पुढील महिन्याचा कोटा दहा दिवस अगोरदरच विक्रीस प्रथमच परवानगी दिली आहे. त्याचा तत्काळ परिणाम होऊन घाऊक बाजारात साखरेचे दर क्विंटलला 25 रुपयांनी उतरले.
ऐन गौरी-गणेशोत्सवाच्या सणामुळे किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रति किलोस 40 रुपयांवर आहेत. सप्टेंबर महिन्यासाठी मागणीच्या तुलनेत मुबलक कोटा देऊनही साखर कारखान्यांकडून माल विक्रीस हात आखडता घेतला जात आहे. उंच दरात साखरेची खुली विक्री ठेवली जाते आणि निविदांमध्ये कमी माल विक्री होण्यामुळे प्रत्यक्ष बाजारात साखरेची अपेक्षित आवक वाढत नसल्याचे बाजारपेठेतील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच केंद्राने दरपातळी खाली येण्यासाठी पुढील महिन्याचा कोटा सप्टेंबरमध्ये विक्रीस परवानगी दिली आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी क्विंटलचा दर 3925 ते 3950 रुपये होता. कोट्याच्या घोषणेनंतर या दरात क्विंटला 25 रुपयांनी घट होऊन तो 3900 ते 3925 रुपयांवर खाली आल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. दरम्यान, कारखान्यांवर साखर निविदा क्विंटलला 3640 ते 3700 रुपये या दराने जात आहेत.
मुबलक कोटा देऊन साखरेचे दर अपेक्षित प्रमाणात खाली येत नसल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. त्यामुळेच देशात साखर साठे पुरेसे असतांनाही दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी आगाऊ महिन्याचा साखर कोटा खुला करुन तत्काळ विक्रीस परवानगी देण्याचा नवा पॅटर्न सुरु झाल्याची चर्चा साखर वर्तुळात आता सुरु झाली आहे.
केंद्राने व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या साखळी किरकोळ विक्रेते आणि प्रक्रियादार यांच्याकडून साखर साठ्याचे साप्ताहिक अहवाल बंधनकारक केल्याचेही समजते. अत्यावश्यक वस्तू कायद्यांन्वये त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.केंद्रीय साखर संचालक संगीत यांनी ग्राहकांना परवडणार्या किमतीत साखर उपलब्ध होण्याकामी राज्यांच्या प्रधान सचिव, अन्न सचिवांना साखरेच्या किंमती आणि साठ्यावर नजर ठेवण्याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत.
हेही वाचा