नाशिक : चुकून आलेले पावणेदोन लाख रुपये केले परत, शेतकरी महिलेची इमानदारी | पुढारी

नाशिक : चुकून आलेले पावणेदोन लाख रुपये केले परत, शेतकरी महिलेची इमानदारी

लासलगाव ( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याला बाजारभाव नाही, त्यात कांद्याची बाजारपेठ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांतील कांद्याचे लिलाव पुन्हा बेमुदत काळासाठी बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेले कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असताना, चुकून 1 लाख 76 हजार 419 रुपये आलेले कांदा उत्पादक महिला शेतकरी निर्मला भाऊसाहेब कदम यांनी कमल आबाजी सोनवणे यांना परत करत आपली इमानदारी दाखवल्याने, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबधित बातम्या :

लासलगाव येथील आबाजी सोनवणे यांचे प्रॉव्हिडंट फंड व इतर मिळणारी रक्कम नाशिक जिल्हा को-ऑपरेटिव्ह भूविकास बँकेतून लासलगाव येथील बँक ऑफ बडोदा टाकळी शाखेत कमल आबाजी सोनवणे यांच्या बँक खात्यात 1 लाख 76 हजार 419 रुपये जमा होणार होते. मात्र बँक खात्याचा शेवटचा एक क्रमांक चुकल्याने येवला तालुक्यातील निळखेडे येथील महिला शेतकरी निर्मला भाऊसाहेब कदम यांच्या खात्यामध्ये 1 लाख 76 हजार 419 रुपये ही रक्कम चुकून जमा झाली. हा संपूर्ण प्रकार जून महिन्यात घडला होता. त्याबाबत कांदा उत्पादक शेतकरी निर्मला कदम यांना कुठलीही माहिती नव्हती. आता 350 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे अनुदान बँक खात्यामध्ये जमा होणास सुरुवात झाल्याने किती अनुदान आले, याची माहिती घेण्यासाठी कदम या लासलगाव येथील बँक ऑफ बडोदा येथे गेल्या असता, अचानक इतकी मोठी रक्कम आल्याने सुखद धक्का बसला. पण इतकी रक्कम आली कशी, याची चौकशी केली असता, ही रक्कम आपली नसल्याचे सांगत त्यांनी कोणत्या बँक खात्यातून आली आहे. त्याची माहिती घेत संबंधित बँकेशी संपर्क केला. भूविकास बँकेच्या व्यवस्थापक मीना एखंडे यांनी तपासणी केली असता, शेवटचा एक क्रमांक चुकल्यामुळे हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. आबाजी सोनवणे यांच्या पत्नी कमल सोनवणे यांच्याशी संपर्क करत केदारनाथ नवले, सागर कदम, मंगेश कदम, भाऊसाहेब कदम यांच्या उपस्थितीत 1 लाख 76 हजार 419 रुपये रकमेचा धनादेश सोनवणे यांना दिला. या प्रामाणिकपणाबद्दल कदम यांचे सोनवणे यांच्या कुटुंबाने आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button