भारतीयांचे सरासरी आयुर्मान दुपटीवर | पुढारी

भारतीयांचे सरासरी आयुर्मान दुपटीवर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती आणि औषध निर्माण क्षेत्रातील आमूलाग्र संशोधनामुळे स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षांत भारतीयांचे आयुर्मान सुमारे दुप्पट म्हणजे सत्तरीचा उंबरठा ओलांडून पुढे गेले आहे. या स्थितीत पर्यावरणातील प्रदूषणाचे प्रमाण रोखणे आणि चंगळवाद सोडून आरोग्यमय जीवनशैलीची कास धरली, तर भारतीयांचे आयुर्मान 2050 सालापर्यंत 80 वयोमानाचा टप्पा ओलांडून पुढे जाऊ शकते, असा अंदाज जागतिक स्तरावर नोंदविण्यात आले आहे.

भारत स्वतंत्र झाला, तेव्हा 1947 मध्ये भारतीयांचे सरासरी आयुर्मान 32 वर्षांचे होते. त्याला कारणेही तशीच होती. केवळ आयुर्वेद आणि भारतीय वैद्यकीय पद्धतीवर आधारित उपचार उपलब्ध होते. शिवाय, दारिद्य्रात जगणार्‍या नागरिकांची टक्केवारी लक्षणीय होती. सकस आहाराचा अभाव आणि लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांच्या अत्यल्प संख्येमुळे हे आयुर्मान कमी होते. तसेच सरासरी आयुर्मान मोजण्यासाठी उपलब्ध यंत्रणाही तोकडी होती. महायुद्ध, महामारी, नैसर्गिक आपत्तीमध्ये दगावणार्‍या नागरिकांच्या मृत्यूच्या नोंदी आणि त्यावरून सरासरी आयुर्मान काढले जात होते; पण स्वतंत्र भारतामध्ये भारतीय आरोग्यसेवेने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. गेल्या 75 वर्षांत जीवनशैली बदलण्याचा कल वाढला.

सकस आहाराविषयी जागरूकता निर्माण झाली. लोकसंख्या आणि डॉक्टर यांचे प्रमाण जसे उंचावले, तसे अत्याधुनिक उपचारपद्धती दाखल झाल्या. शिवाय, अ‍ॅलोपॅथीने जसे आपले बस्तान बसविले, तसे भारतामध्ये बघता बघता सरासरी आयुर्मानाचा आलेखही वाढत गेला. गेल्या तीन वर्षांमध्ये हा बदल प्रतिवर्षी 0.33 टक्क्याने वाढतो आहे आणि आता 2022 अखेरीस त्याने आपली मजल 70.9 वर नेली आहे.

नवा आदर्श निर्माण करण्याची संधी

भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढणे ही जशी नाण्याची एक बाजू आहे, तसे भारत मधुमेहग्रस्त रुग्णांची राजधानी बनणे आणि उच्च रक्तदाब व हृदयरुग्णांचा आलेख वाढणे ही नाण्याची दुसरी चिंताजनक बाजू आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांनी त्यांच्याच पूर्वजांनी विकसित केलेल्या आहारशास्त्र, योगशास्त्र, जीवनशैली विकासशास्त्र या सध्या जगभरातील नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या पद्धतींचा अवलंब जीवनामध्ये करण्यास सुरुवात केली, तर भारतीयांचे आयुर्मान औषधी गोळ्यांशिवाय ऐंशीचा उंबरठा ओलांडून जगापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित करण्याची संधी मिळविणे शक्य आहे.

Back to top button