Ganeshotsav 2023 : पालिकेच्या विसर्जन हौदातच अस्वच्छ पाणी; पुण्यात गणेशभक्तांचा संताप | पुढारी

Ganeshotsav 2023 : पालिकेच्या विसर्जन हौदातच अस्वच्छ पाणी; पुण्यात गणेशभक्तांचा संताप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जनासाठी महापालिकेने बांधलेल्या विसर्जन हौदात नदीपात्रातील पाण्यापेक्षाही अधिक अस्वच्छ पाणी आणि राडारोडा असल्याचे समोर आले आहे. नदीपात्रातील नाना-नानी उद्यानासमोरील विसर्जन हौदात कचरा आणि घाण पाणी असल्याने दीड दिवसाच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी संताप व्यक्त केला. नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला महापालिकेने बंदी घातली आहे. त्यामुळे नदीत मूर्ती विसर्जन न करता महापालिकेने बांधलेल्या विसर्जन हौदातच मूर्ती विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेकडून सातत्याने केले जात आहे.

मुळा-मुठा नदीपात्रातील मैलापाणीमिश्रित पाणी पाहून आता नागरिकही विसर्जन हौदात मूर्ती विसर्जनाला प्राधान्य देतात. मात्र, पहिल्याच दीड दिवसाच्या विसर्जनाला नदीपात्रातील रस्त्यालगतच्या नाना-नानी उद्यानासमोरील विसर्जन हौद स्वच्छच केला नसल्याचे आढळून आले. या हौदात अस्वच्छ पाण्याबरोबर कचरा, इतर साहित्य पडल्याचे आढळून आले. त्यामुळे अनेक भक्तांनी हौदात विसर्जन न करता घरी जाऊन विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी नाइलाजास्तव नदीत मूर्ती विसर्जन केले.

विशेष म्हणजे प्रत्येक घाटावर एक मदतनीस, अग्निशमन दल कर्मचारी तसेच पालिकेचे कर्मचारी असतील असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी ही यंत्रणा आढळून आली नाही तसेच निर्माल्य ठेवण्यासाठीही कंटेनर नसल्याने हौदाच्या बाजूला नागरिकांनी निर्माल्य टाकल्याचे चित्र होते.

हेही वाचा

आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची दीड हजार कोटींची फसवणूक; लोहितसिंगची कबुली

Back to top button