पिंपरी : पालिका वाहनांवर ‘मेस्को’चे चालक | पुढारी

पिंपरी : पालिका वाहनांवर ‘मेस्को’चे चालक

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांतील कामकाजासाठी तसेच, अधिकार्‍यांसाठी वाहनचालक नसल्याने कामांना विलंब होत आहेत. तसेच, दैनंदिन कामकाजाचा खोळंबा होत आहे. कामकाज सुरळीत होण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडून (मेस्को) 60 वाहनचालक दोन वर्षांसाठी मानधनावर घेतले आहेत. त्यासाठी 8 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या विविध विभागांसाठी वाहनचालक उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामकामांचा खोळंबा होतो.

विविध विभागांनी मागणी केल्यानुसार महापालिकेच्या यांत्रिक विभागाने मेस्कोचे 60 वाहनचालक मानधनावर घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या वाहनचालकांना महिन्यातील 26 दिवसांचे वेतन, महागाई भत्ता फरक, अतिकालीन भत्ता देण्यात येणार आहे. वाहनचालकास दर महिन्यास 34 हजार 446 रूपये मानधन दिले जाणार आहे. मेस्कोकडून 60 वाहनचालक नेमण्यास तसेच, त्याच्यावरील 2 वर्षांच्या वेतनाच्या एकूण 8 कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

अतिक्रमण कारवाईसाठी वाहनचालकांची भरती ?

तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीनंतर शहरात अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई ठप्प आहे. विनापरवाना फ्लेक्स तसेच, टपर्‍या व हातगाड्यांवर महिन्यातून एक ते दोन वेळा दिखाऊ कारवाई केली जाते. वारंवार तक्रारींनंतरही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतो. जनसंवाद सभेत या संदर्भातील तक्रारींची संख्या वाढत आहे. वाहनचालक नसल्याने कारवाई अडथळा येत असल्याचे कारण क्षेत्रीय अधिकार्‍यांनी पुढे केले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने इतक्या मोठ्या संख्येने वाहनचालक नियुक्तींचा निर्णय घेतला आहे. हे वाहनचालक सेवेत आले तरी, अतिक्रमण कारवाई ठोस कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा

पोलिस कायम बंदोबस्तावर ! मोठ्यांच्या सुरक्षेतच खर्च होतेय ऊर्जा ! 

Amol Kharat | छत्रपती संभाजीनगर : लढवय्या संशोधक अमोल खरातची मृत्यूशी झुंज अपशयी

पिंपरी : अडीच महिन्यांत डेंग्यूचे 125 बाधित रुग्ण

Back to top button