Amol Kharat | छत्रपती संभाजीनगर : लढवय्या संशोधक अमोल खरातची मृत्यूशी झुंज अपयशी | पुढारी

Amol Kharat | छत्रपती संभाजीनगर : लढवय्या संशोधक अमोल खरातची मृत्यूशी झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लढवय्या संशोधक विद्यार्थी अमोल खरात याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा माजी राज्याध्यक्ष अमोल खरात याला न्युरो ऑटोइम्यून या दुर्मिळ आजाराची लागण झाली होती. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

अमोल हा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील संशोधक विद्यार्थी होता. सहा महिन्यांपूर्वी अमोल खरात याच्या नेतृत्वाखालीच बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे मुंबईतील आझादा मैदानावर आंदोलन झाले. तब्बल पन्नास दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व आठशे संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशीप लागू केली. या लढ्यात अमोल खरातचे योगदान मोठे होते. विद्यापीठाशी संबंधित आंदोलनांमध्ये तसेच परिवर्तनवादी चळवळीत तो कायम अग्रेसर असायचा. अमोल खरातच्या मृत्यूनंतर लढवय्या संशोधकाचा मृत्यू झाल्याची भावना विद्यापीठ वर्तुळात दिसून येत आहे. अमोल हा मूळचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील रहिवासी होता. काही वर्षांपासून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विषयात संशोधन करत होता. त्याला नुकतीच फेलोशीपही मिळाली होती.

दरम्यान, अमोलवर आधी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नंतर त्याला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. अमोलच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजल्यावर त्याच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले होते. विद्यापीठ वर्तुळातील आणि विद्यार्थी चळवळीशी संबंधित अनेकांनी त्याला आर्थिक मदत दिली होती. मात्र, अमोलची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज गुरुवारी पहाटे संपली.

Back to top button