पोलिस कायम बंदोबस्तावर ! मोठ्यांच्या सुरक्षेतच खर्च होतेय ऊर्जा !  | पुढारी

पोलिस कायम बंदोबस्तावर ! मोठ्यांच्या सुरक्षेतच खर्च होतेय ऊर्जा ! 

श्रीकांत राऊत

नगर : सभा, मोर्चा, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांसह व्हीआयपींच्या दौर्‍यांसाठी पोलिसांना बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेची ड्यूटी असते. शिर्डी, शनिशिंगणापूर आदी धार्मिक स्थळे व राजकीय सभांसाठी व्हीआयपींची नगरवारी सुरूच असते. गेल्या 9 महिन्यांत तब्बल 975 व्हीआयपींचे नगरमध्ये दौरे झाले. त्यामध्ये राष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्र-राज्यांचे मंत्री व इतर पुढार्‍यांचा समावेश आहे. एकंदरीतच काय तर, वर्षातील 365 दिवसांपैकी सरासरी 200 दिवस पोलिसांना बंदोबस्ताचीच ड्यूटी करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

हेही वाचा :

सरकार कोणाचेही असो, जिल्ह्यातील एका वा अधिक नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश ठरलेला असतो. यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. नगर जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांवर विविध बंदोबस्ताचा ताण कायम असतो. वारी, मोर्चे, राजकीय पुढार्‍यांच्या सभा आदी बंदोबस्त योग्य हाताळून गुन्ह्यांचा तपास वेळेत लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. राज्यातील सत्तासंघर्षामुळे दीड वर्षापासून जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या सभा होत आहेत. त्यातच पुन्हा विविध विषयांवरून आंदोलने, मोर्चे सुरू आहेतच.

सणोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. पोलिसांना तपासकाम बाजूला ठेवून वारंवार बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे. दरम्यान, आता सण-उत्सवाचा काळ असून त्यानंतर निवडणुकीचा बंदोबस्त राहणार आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. त्या वेळीदेखील पोलिसांना सतत बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात महत्त्वाचे दौरे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुख्य न्यायमूर्ती धंनजय चंद्रचूड
राज्यपाल रमेश बैस
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

हेही वाचा :

Back to top button