पिंपरी : अडीच महिन्यांत डेंग्यूचे 125 बाधित रुग्ण | पुढारी

पिंपरी : अडीच महिन्यांत डेंग्यूचे 125 बाधित रुग्ण

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : डेंग्यूचे गेल्या अडीच महिन्यांत 125 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 7 रुग्णांना हिवतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चिकुनगुणिया आजाराचे बाधित रुग्ण आढळले नसले तरी 18 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या तिन्ही आजारांबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

चिकुनगुणियाचा बाधित रुग्ण नाही

हिवतापाचा जुलै महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही. तथापि, ऑगस्टमध्ये 6 बाधित रुग्ण आढळून आले. तर, सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत 1 बाधित रुग्ण आढळला आहे. चिकूनगुणियाचा अद्याप एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, गेल्या अडीच महिन्यांत या आजाराचे 18 संशयित रुग्ण आढळले आहेत. जुलैमध्ये 10, ऑगस्टमध्ये 7 आणि सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत 1 संशयित रुग्ण आढळुन आला आहे.

दवाखान्यात त्वरित तपासणी करा

शहरात डेंग्यू, चिकुनगुणिया तसेच हिवताप या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे या आजारांची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या दवाखान्यात तपासणी करून घ्यावी. आठवड्यातून किमान 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. घरातील पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून घासून, पुसून कोरडी करून घ्यावी. पाण्याचे साठे घट्ट झाकणांनी बंद करावे. घराच्या परिसरातील किंवा घराच्या छतावरील निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात. डासांपासून व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिरोध क्रिमचा वापर करावा. घर व परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी
केले आहे.

नागरिकांचे हवे सहकार्य

महापालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुणिया यासारखे रोग पसरू नयेत म्हणून महापालिका विविध उपाययोजना करत आहे. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण
शहरामध्ये सध्या सर्वाधिक प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून आहेत. विशेषतः जुलै महिन्यापासून या आजाराचे बाधित रुग्ण आढळण्यास सुुरुवात झाली आहे. जानेवारी ते जून या कालावधीत केवळ संशयित रुग्ण आढळत होते. जुलै महिन्यात 36, ऑगस्टमध्ये 52 तर, सप्टेंबर महिन्यात मंगळवारपर्यंत (दि. 19) 37 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

…अन्यथ कठोर कारवाई

उद्योगधंदे, बांधकामाची ठिकाणी, कार्यालये, सोसायट्या, बैठी घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डास उत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. शहरात सुरु असलेल्या विविध बांधकामाच्या ठिकाणी महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या भागांची तपासणी करून तेथे डासोत्त्पत्ती स्थानके नष्ट करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. डासोत्पत्ती ठिकाणे आढळून आलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईसुद्धा केली जात आहे.

प्रभागनिहाय विशेष पथक

शहराच्या विविध भागातील डासोत्त्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी प्रभागनिहाय विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकामार्फत नियमितपणे तपासणी आणि कारवाई करण्यात येत आहे. पथकांमध्ये आवश्यक मनुष्यबळ वाढविले आहे.

हेही वाचा

आनंदाच्या शिध्याला सोनकिड्यांची बाधा तर पामतेलाने घशात खवखव

पुणे : ‘वैशाली’च्या अतिक्रमणावर हातोडा

Ganesh Ustav : नवसाला पावणारा मुगवलीचा श्री स्वयंभू गणपती

Back to top button