नाशिक : बेशिस्त पार्किंगवर टोईंगची मात्रा ; मनपा व पोलिस प्रशासनाचा संयुक्त निर्णय | पुढारी

नाशिक : बेशिस्त पार्किंगवर टोईंगची मात्रा ; मनपा व पोलिस प्रशासनाचा संयुक्त निर्णय

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

शहरात अस्ताव्यस्त उभी केली जाणारी वाहने व त्यामुळे उदभवणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची एकत्रित उपाययोजना म्हणून पुन्हा एकदा टोईंग सेवा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मुंबई नाका, द्वारका, रविवार कारंजा आदी वाहनांची वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी वाहतूक नियोजनासाठी मानधनावर ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

संबधित बातम्या :

शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, शालिमार तसेच द्वारका आणि मुंबई नाका चौकात दररोज होणारी वाहतुक कोंडी नागरिक व वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रामुख्याने शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ व इंधन खर्च तसेच वायू प्रदूषणाची समस्या देखील गंभीर रूप धारण करत आहे. परिणामी महापालिका व पोलिसांच्या कारभारावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

विकेंड ट्रॅफिक हा शहराची नवी समस्या बनत चालली आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने त्यावर अभ्यास केल्यानंतर बेशिस्तपणे रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने, लेन कटिंगसारख्या बाबींमुळे वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत असल्याचे समोर आले. त्यावर मार्ग काढण्यासाठी बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाईसाठी टोईंगसेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरीत्या ही मोहिम राबविली जाणार आहे. त्याचप्रमाणे वाहतुक पोलिसांना सहकार्यासाठी मोठ्या शहरांच्या धरतीवर ट्रॅफिक वॉर्डन मानधनावर नियुक्त करून देता येईल का ? होमगार्डची मदत घेता येईल काय या पर्यायांचाही विचार सुरू आहे.

मुंबई नाक्यावरील वाहतुक कोंडी गंभीर

शहरात मुंबई नाका चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सर्वाधिक गंभीर बनला आहे. मुंबई नाका येथे वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा थेट परिणाम आडगाव किंवा नाशिकरोड कडे जाणाऱ्या रस्त्यावरून द्वारका चौक येथे होतो. मुंबईच्या दिशेने जाताना इंदिरानगर बोगदा तसेच येथून पुढे सिटी सेंटर मॉलकडे जाणारी वाहतूक ठप्प होते. त्र्यंबक नाका, गडकरी चौक, सीबीएस व अशोकस्तंभ हे चारही चौक वाहतुक कोंडीने ग्रस्त बनतात.

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तांसमवेत चर्चा झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी टोइंगसेवा, ट्रॅफिक वॉर्डन तसेच सशुल्क पार्किंगची स्थळे निश्चित करण्यात येत आहेत.

– डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, मनपा.

हेही वाचा :

Back to top button