Pune Crime News : आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री; दलालांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

Pune Crime News : आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री; दलालांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आखाती देशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांसह चौघींना डांबून ठेवून त्यांचा छळ केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आखाती देशात सफाई काम करणार्‍या महिलांची दलालांनी चार लाख रुपयांत विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी दलाल नसरीन भाभी, अब्दुल हमीद शेख, शमिमा खान, हकीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दोन महिलांनी फिर्याद दिली असून, मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फिर्यादी महिला मार्केट यार्ड भागातील डॉ. आंबेडकर वसाहतीत राहायला आहेत. चंदननगर भागातील एका महिलेने आखाती देशात सफाई कामाची नोकरी आहे. दरमहा 35 ते 40 हजार रुपये वेतन मिळेल, असे महिलांना सांगितले होते. तक्रारदार महिलांनी मुंबईतील दलाल नसरीन भाभी, अब्दुल शेख, शमीमा खान, हकीम यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सौदी अरेबियातील रियाध शहरातील एका अरबी व्यक्तीकडे त्यांना साफसफाईचे काम मिळवून दिले होते. पुण्यातील तीन महिला अरबी व्यक्तीकडे काम करत होत्या.

अरबी व्यक्तीने त्यांचा छळ सुरू केला. त्यांना वेळेवर जेवण दिले जात नव्हते. रात्री काम करायला सांगितले जात होते. विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जात होती. दलालांनी महिलांची सौदी अरेबियातील व्यक्तीला चार लाख रुपयांत विक्री केली होती. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन फसवणूक केली. महिलांनी दलालांशी संपर्क साधला. तेव्हा चार लाख रुपये द्यावे लागतील, असे दलालांनी सांगितले होते. फसवणूकप्रकरणी दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.

एका महिलेला परत आणण्यात यश

सौदी अरेबियात गेलेल्या महिलांनी समाजमाध्यमातून राज्य महिला आयोगाचा संपर्क क्रमांक मिळविला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांंनी महिलांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सौदी अरेबिया, भारतीय दुतावासातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून महिलांना मायदेशी आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर महिलांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला. पुण्यातील तीन महिलांसह चेन्नईमधील एका महिलेला परत आणण्यात यश आले.

हेही वाचा

Pune Crime : आता पुण्यातही वाजणार छमछम? मद्यधुंद रात्रीला विदेशी ललनांची मैफल

नाशिक : दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या विहिरीतून बाहेर

Pune Ganeshotsav 2023 : देवेंद्र फडणवीसांचा आज पुणे दौरा; विविध गणपती मंडळांना देणार भेट

Back to top button