

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पाय हलवू नको, असे म्हटल्याच्या राग आल्याने पतीला दोरीने बांधून त्याच्यावर चाकूने वार केले. यामध्ये पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली.
विजयसिंह शहाजी गायकवाड (28, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे जखमी पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी विजयसिंह हे त्यांच्या पत्नीसोबत घरात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी पत्नी सतत पाय हलवत होती. त्या वेळी विजयसिंह यांनी पत्नीला 'पाय हलवू नको' असे बजावले. तसेच, मी पाय न हलवता बसू शकतो, असे त्यांनी पत्नीला सांगितले. याचा राग आल्याने काही वेळाने आरोपी पत्नीने विजयसिंह यांना 'मी तुमचे पाय बांधते, तुम्ही तसेच बसून दाखवा' असे म्हटले. विजयसिंह यांनी पाय बांधून घेण्यास होकार दिला. त्यानुसार, आरोपी पत्नीने त्यांचे हात, पाय दोरीने बांधले. तसेच, तोंडावर चिकट टेप लावला. त्यानंतर कापडाने डोळे झाकून विजयसिंह यांच्या छातीवर बसून त्यांच्या गळ्यावर, हातावर चाकूने वार केले. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा