छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवात पोलिसांच्या सुट्या केल्या रद्द | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवात पोलिसांच्या सुट्या केल्या रद्द

छत्रपती संभाजीनगर,पुढारी वृत्तसेवा : रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा भागात झालेली दंगल अन् राज्यातील सामाजिक वातावरण पाहता संवेदनशील छत्रपती संभाजीनगरात गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून यंदा तब्बल २ हजार ७०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३३३ ठिकाणी फिक्स पॉइंट लावले असून २१ फिक्स पॉइंट हे अतिमहत्त्वाचे आहेत.  याशिवाय पाच ठिकाणी वॉच टॉवर, सहा ठिकाणी चेक पोस्ट आणि शहरातील प्रत्येक गल्लीबोळांमध्येही पोलिस पायी गस्त चालणार आहेत. तसेच शासनाने या गणेशोत्सवात पोलिसांच्या सर्व प्रकारच्या रजा (साप्ताहिक सुट्या व वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. शहरात ९०० हून अधिक सार्वजिनक तर सुमारे दीड लाख घरगुती गणेश मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. गणेश भक्तांच्या या उत्सवात कुठलेही विघ्न येऊ नये, यासाठी पोलिसांनीही तयारी पूर्ण केली आहे. सुमारे दहा दिवस स्थानिक व बाहेरील पोलिस अधिकारी, कर्मचारी मिळून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणार आहेत. आक्षेपार्ह देखाव्यांना बंदी असून ठाणेदार त्यावर विशेष लक्ष ठेवतील.

असा असणार आहे बंदोबस्त

पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त, ५ सहायक आयुक्त, २८ पोलिस निरीक्षक, ७४ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, १ हजार ५९० पुरुष तर ११५ महिला अंमलदार बंदोबस्तावर तैनात असतील, याशिवाय बाहेरून आलेला राज्य राखीव पोलिस दल आणि रॅपिड अॅक्शन फोर्स व होमगार्ड यांचा बंदोवस्त असणार आहे. २१ संवेदनशील ठिकाणी १६ अधिकारी, ८४ अंमलदारांचे फिक्स पॉइंट असतील. ६२ अंमलदार महत्त्वाच्या ३१ भागांमध्ये पायी घालतील. १४८ बीट मार्शल रात्री पेट्रोलिंग करतील. तसेच, प्रत्येक ठाण्यात एक म्हणजे, १७ उपनिरीक्षक आणि २०५ अंमलदार राखीव असतील.

Back to top button