पिंपरीत गणपतीचा जयजयकार; गणरायाच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सजली | पुढारी

पिंपरीत गणपतीचा जयजयकार; गणरायाच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सजली

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आजपासून घरोघरी श्री गणरायाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच घरोघरी गणरायांच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. काहींनी पूर्वसंध्येलाच गणेशमूर्ती वाजत गाजत घरी नेल्या. बाप्पांच्या मूर्तीबरोबरच आता दहा दिवस घराघरातील आनंद अन् उत्साहात भर पडणार आहे. बाप्पाच्या स्वागताचा उत्साह बघता उद्योगनगरी सज्ज झाली असल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सवाची उत्सुकता अबालवृद्धांना असते. गणरायाचे आगमन होणार म्हणून गेल्या पंधरवड्यापासून घरोघरी तयारी जोरात सुरू आहे. स्वच्छता, आरासाची सजावट कशी करायची, गणरायाचे स्वागत कशा पद्धतीने करायचे आदीच्या नियोजनात अख्खी कुटुंबे रंगली आहेत. बाप्पांच्या आगमनानंतर कुटुंबांच्या आनंदात आणखीन भर पडणार आहे. आज रात्री उशिरापर्यंत घरोघरी आरास करण्यात कुटुंबातील सदस्य गुंतले होते. विशेष करून चिमुकल्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. सार्वजनिक मंडळांच्या भल्या मोठ्या उंचीच्या मूर्तीचेही आज वाद्यांच्या गजरात आगमन होणार असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साहसुद्धा वाढला होता.

शहरात गणेशोत्सव मंडळाच्या मंडप बांधणीस वेग आला आहे. आकर्षक मंदिरे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.
घरगुती गणपती म्हणजे कुटुंबातील पुरुष वर्गाची वेगळी आणि महिलांची वेगळी तयारी असते. जितके दिवस गणरायाचा मुक्काम तेवढे दिवस नैवेद्य, फळे व फुले, रांगोळी यांची तयारी करण्यात महिलावर्ग दंग आहे. रोजच वेगळा नैवद्य यासाठी वेगवेगळे खाद्य पदार्थांची खरेदी. तसेच गौरी आगमनासाठी साड्या, दागिने यांची खरेदी महिलावर्गाकडून केली जात होती. तर पुरुषवर्ग सजावट साहित्य आणि डेकोरेशन कामात व्यस्त पहायला मिळाला.

हेही वाचा

Pune Crime : पुण्यात खळबळ! गाढ झोपेत असताना मुलाने केला वडिलांचा खून

Good news ! कांदा उत्पादकांना मिळणार 818 कोटींचे अनुदान

Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशभक्तांसाठी अशी असेल पार्किंग व्यवस्था!

Back to top button