Pune news : भाजप शहर कार्यकारिणी निवडीवरून कलह | पुढारी

Pune news : भाजप शहर कार्यकारिणी निवडीवरून कलह

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडीवरून पक्षातच कलह निर्माण झाला आहे. सरचिटणीसपासून युवा मोर्चापर्यंतच्या पदांसाठी जोरदार स्पर्धा रंगली असून, त्यातून राजीनाम्यापर्यंतचा पवित्रा काही ज्येष्ठांनी उचलला आहे. त्यामुळे आता कार्यकारिणीबाबतच्या निर्णयाचा चेंडू थेट वरिष्ठ नेत्यांकडे निर्णयासाठी गेला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भाजपच्या शहर अध्यक्षपदी धीरज घाटे यांच्या निवडीनंतर नव्याने शहर कार्यकारिणी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, कार्यकारिणीत नक्की कोणाला संधी द्यायची याबाबत शहरातील काही आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या :

घाटे यांनी सूचविलेल्या नावांवर पक्षातील मंडळींचे एकमत होत नसल्याने त्यातून संघर्षाचे फटाके फुटले असल्याचे समजते. गतवेळेप्रमा़णेही या वेळीही सरचिटणीसांची संख्या आठपर्यंत पोहोचली असल्याचे सांगण्यात आले. त्यात एका विधानसभा मतदारसंघात एका माजी नगरसेवकाला सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्याची सूचना एका वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, संबधित आमदारांनी त्या नावाला थेट विरोध दर्शविला.

या माजी नगरसेवकाला सरचिटणीस केले जाणार असेल तर आपण राजीनामा देऊ, असा पवित्रा या आमदारांनी घेतला. पण हे आमदार कायमच नाराज असतात, असे सांगत या वरिष्ठ नेत्याने संबधित माजी नगरसेवकाला सरचिटणीस करा, अशी भूमिका कायम ठेवली. कार्यकारिणीत ठराविक मंडळींनाच स्थान मिळत असल्याने काही विधानसभा अध्यक्षांपासून मंडल अधिकार्‍यांपर्यंतच्या पदाधिकार्‍यांनी आपली नाराजी बोलून दाखविली. तर एका माजी नगरसेवकाने याबाबत पालकमंत्र्यांकडे थेट नाराजीही व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.

भाजप युवा मोर्चासाठीही रस्सीखेच
भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक दोन माजी पदाधिकार्‍यांमध्ये आपल्या समर्थकांना या पदावर संधी देण्यासाठी जोरदार स्पर्धा रंगली आहे. त्यातच एका आमदारांनी उडी घेत स्वत:च्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करा, असा हट्ट धरला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर युवा मोर्चातील काही पदाधिकार्‍यांना कार्यकारिणीत घेण्यावरूनही काही मंडळींचा विरोध आहे.

बावनकुळे यांचा प्रयत्न
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांची बैठक घेऊन एकमत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नसल्याचे समजते. त्यामुळे आता यासंबधीच्या निर्णयाचा चेंडू थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेला असल्याचे सांगण्यात आले.

कार्यकारिणीच्या निवडीवरून पक्षात कसलेही वादविवाद नाहीत. पदांसाठी स्पर्धा कायमच होत असते. प्रदेशाध्यक्षांच्या मंजुरीने लवकरच कार्यकारिणी जाहीर होईल.
                                                      -धीरज घाटे, शहराध्यक्ष भाजप. 

हेही वाचा :

Back to top button