पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला स्वदेशीचा मंत्र | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला स्वदेशीचा मंत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वाढदिवसाचे औचित्य साधत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात भव्य कन्व्हेन्शन सेंटरपैकी एक असलेल्या यशोभूमी सेंटरचे उद्घाटन आणि कारागिरांना प्रोत्साहन देणार्‍या विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला. 13 हजार कोटींची ही योजना आहे. यावेळी मोदी यांनी देशाला स्वदेशीचा मंत्र दिला. भारतात तयार होणारी उत्पादने विदेशी बाजारात पोहोचण्याआधी स्वदेशीचा वापर आपण हक्काने करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दिल्लीच्या द्वारका येथील यशोभूमी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटरचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्याच कार्यक्रमात कुशल कारागिरांसाठी असलेल्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना मोदी यांनी स्वदेशीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, भारतात तयार होणारी उत्पादने जागतिक बाजारात गेलीच पाहिजेत. पण त्यासाठी आधी आपण स्वदेशीसाठी आग्रही असायला हवे. स्वदेशी वस्तूंची खरेदी आपणच आधी करायला हवी. मग या स्थानिक उत्पादनांना ग्लोबल करता येईल. गणेश चतुर्थी, धनत्रयोदशी, दीपावली आणि अनेक सण आता येत आहेत. या सणाच्या काळात स्थानिक उत्पादनेच घ्यावीत, अशी विनंतीही मोदी यांनी देशवासीयांना केली. ते म्हणाले, स्थानिक उत्पादन लहान असो की मोठे असो, त्यावर विश्वकर्मा कारागिराचे लेबल असेल तर आवर्जून खरेदी करायला हवे.

कारागीर व कलांवत हे समाजाचा कणा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशाला यशोभूमी हे इंटरनॅशनल एक्स्पो सेंटर मिळाले आहे. हे देशातील सर्व विश्वकर्मांसाठी दिलेले केंद्र आहे. भारतीय कला आणि हस्तशिल्पांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी हे केंद्र काम करेल. देशातील कारागीर व कलावंत हे समाजाचा कणा आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, या कलावंतांना पुढे जाण्यासाठी हात देणे ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील विश्वकर्मांसाठी 13 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या कार्यक्रमाआधी पंतप्रधानांनी द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमीपर्यंंत मेट्रो एक्स्प्रेस लाईनच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन केले.

18 हस्तकलांचा समावेश

या योजनेमध्ये सुतार, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे, लोहार, हातोडी आणि अवजार संच बनवणारे, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट, चर्मकार (पादत्राणे कारागीर), गवंडी, टोपल्या, चटई, केरसुणी, काथ्याचे साहित्य बनविणारे कारागीर, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे कारागीर, केश कर्तनकार, पुष्पहार, पुष्पगुच्छ बनवणारे कारागीर, परीट, शिंपी आणि मच्छीमारीसाठी जाळे विणणारे कारागीर यांसारख्या पारंपरिक व्यवसायांचा समावेश आहे.

Back to top button