वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : 'वन नेशन वन रेशन' योजना सुरू होऊनही जवळपास रेशनिंग दुकान नसल्याने सिंहगड किल्ल्याच्या दर्याखोर्यांतील आदिवासींसह मजूर, शेतकर्यांना गणेशोत्सवाचा 'आनंदाचा शिधा' तसेच रेशनिंग माल घेण्यासाठी 10 ते 15 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. गणेशोत्सवासाठी सिंहगडसह खडकवासला भागातील 27 हजार 167 कुटुंबांना 100 रुपयांमध्ये 'आनंदाचा शिधा' वाटप करण्यात येणार आहे. सिंहगड, अतकरवाडी, सांबरेवाडी, दुरुपदरा, डोणजे भागात आदिवासी महादेव कोळी तसेच कातकरी समाजाची जवळपास 400 हून अधिक कुटुंबे आहेत. बहुतेक कातकरी कुटुंबांना नव्याने रेशनिंग कार्ड मिळाले आहे. त्यामुळे त्यांना प्रथमच 'आनंदाचा शिधा' मिळणार आहे.
संबंधित बातम्या :
सध्या सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या खामगाव मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, माळवाडी आदी खेड्यापाड्यांतील रहिवाशांची 'आनंदाचा शिधा'घेण्यासाठी 15 किलोमीटर अंतरावरील खानापूर (ता. हवेली) येथील रेशनिंग दुकानात झुंबड उडाली आहे.
खामगाव मावळ येथील प्रशांत भोसले म्हणाले की, अनेक वर्षांपासून गावात रेशनिंग दुकान नाही. त्यामुळे आम्हाला रेशनिंग घेण्यासाठी खानापूर येथे जावे लागत आहे. दळणवळणाचे साधन नसल्याने आदिवासी महिला, शेतकर्यांना पायपीट करावी लागत आहे. काही जण दुचाकी, जीप, बसने जातात. मात्र, तीन ते चार तास वाहनांची वाट पाहावी लागते.
भाजपचे व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जावळकर म्हणाले की, मआनंदाचा शिधाफ वाटपासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली दुकानदारांनी नियोजन केले आहे. तर गणेशोत्सवाआधी सर्व लाभार्थ्यांना शिधा वाटप व्हावा. गैरकृत्य तसेच जादा पैसे घेणार्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर यांनी केली आहे.
अनेक महिन्यांपासून सिंहगड किल्ल्याच्या परिसरातील खामगाव मावळ ग्रामपंचायत हद्दीत रेशनिंग दुकान नाही. त्यामुळे नवीन दुकान सुरू करण्यासाठी रीतसर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून खामगाव मावळ येथे दुकान सुरू होणार आहे. या दुकानामुळे सिंहगडच्या दर्याखोर्यातील कार्डधारकांची गैरसोय दूर होणार आहे.
– चांगदेव नागरगोजे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी, खडकवासला विभाग