Nagar news : अपर जिल्हाधिकारी कार्यालयास 100 कोटी : मंत्री विखे पाटील | पुढारी

Nagar news : अपर जिल्हाधिकारी कार्यालयास 100 कोटी : मंत्री विखे पाटील

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर अहमदनगर जिल्ह्यामधील 6 तालुक्यांतील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची होणारी सुरूवात सामान्य नागरीकांच्या सुविधेची मोठी उपलब्धी ठरणार आहे. महसूल विभागाच्या सर्व योजना ई -प्रणालीद्वारे मिळू शकणार आहेत. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी 100 कोटी रूपये मंजूर झाले आहेत, असे सांगत शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आज येथे दिली.

संबंधित बातम्या :

शिर्डी येथे उत्तर अ. नगरमधील 6 तालुक्यांतील नागरिकांच्या शासकीय कामासाठी सुरू केलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पन मंत्री विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. सदाशिव लोखंडे होते. यावेळी खा. डॉ. सुजय विखे पा., आ. आशुतोष काळे, ‘महानंदा’चे अध्यक्ष राजेश परजणे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवाशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी , शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पा. म्हणाले, उत्तर अ. नगरच्या जनतेसाठी शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी उपयुक्तता आहे. नगर जिल्हा भौगोलिकदृष्टीने मोठा आहे. नगर येथे जावून काम करण्यासाठी लागणार्‍या विलंबाचा त्रास यामुळे कमी होईल, असे सांगत या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व अडचणी दूर होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महसूल विभागाच्या बर्‍याच सुविधा ऑनलाईन झाल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत -कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्यावर महसूल विभागाचा भर आहे, असे महसूल मंत्री विखे पा. यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. लाखो शेतकर्‍यांनी 1 रूपयात पीक विमा काढला. शेत पीक नुकसानीची 25 टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, असे स्पष्ट करीत महसूल मंत्री विखे पा. म्हणाले, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने तत्काळ करण्याची गरज आहे.

शिर्डीसह परिसराच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जागेवर एमआयडीसी, श्रीसाईबाबांच्या जीवनावर आधारित 100 कोटी रुप. खर्चून थीम पॉर्क, 600 रु. कोटी खर्चून शिर्डी विमानतळाची नवीन विस्तारित इमारत असे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाबरोबर रोजगार वाढीला चालना मिळणार आहे, असा विश्वास महसूल मंत्री विखे पा. यांनी यावेळी व्यक्त केला. खा. लोखंडे म्हणाले, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण नेवासा तालुक्याचाही समावेश करणे गरजेचे आहे. शेती महामंडळाच्या जागेवर आयटी पार्क झाल्यास शिर्डीची वाटचाल ‘स्मार्ट सिटी’कडे होणार आहे. आ. आशुतोष काळे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. आभार अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button