Sharad Pawar : देशाच्या अखंड ऊर्जा अभियानात साखर उद्योग ठसा उमटवेल : खासदार शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : देशाच्या अखंड ऊर्जा अभियानात साखर उद्योग ठसा उमटवेल : खासदार शरद पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भारताच्या अखंड ऊर्जा कार्यक्रमात इथेनॉल, बायो-सीएनजी आणि हायड्रोजन हे नवीन क्षीतिजे असून त्यांचा वापर करण्याची उपजत क्षमता साखर उद्योगात आहे. त्यामुळे भारताच्या अखंड ऊर्जा अभियानाला गती देऊन सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उभारणीत साखर उद्योग आपला ठसा उमटवेल, असा विश्वास को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित ‘साखर कारखान्यांच्या हरित आणि अक्षय उर्जेसाठी एकात्मिक धोरण’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आणि राष्ट्रीय को जनरेशन पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि.16) सकाळी पवार यांच्या हस्ते वाकड येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

यावेळी व्यासपीठावर को जनरेशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, महासंचालक संजय खताळ, दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुभाष कुमार, केंद्राच्या बायोमासचे सह सचिव डी. डी. जगदाळे, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, हायड्रोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. एस. एस. व्ही. रामकुमार आणि रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय पातळीवरील कोजनरेशन पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा या पुरस्कारांचे दुसरे वर्ष असून सहवीज निर्मिती प्रकल्पांना संस्थात्मक तसेच वैयक्तिक पातळीवर अधिकार्‍यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी हायड्रोजन इंडिया या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. पवार म्हणाले, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक आणि वीज ग्राहक देश आहे.

 

सरकारने नवीन हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी 19 हजार 744 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबरीने एकात्मिक बायोमास एनर्जी कार्यक्रमाचा समावेश असलेल्या साखर कारखान्यांवर आधारित बगॅस सहनिर्मितीचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. यावेळी नरेंद्र मोहन, सुभाष कुमार, रवी गुप्ता यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत संजय खताळ, प्रास्तविक जयप्रकाश दांडेगांवकर यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button