Pune news : संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

Pune news : संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

इंदापूर : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निमगाव केतकी (ता. इंदापूर) सोनमाथा येथील मोठी टेकडी खोदण्यात आली आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वनीकरण असल्याने तेथील चिंकारांसह अन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी संरक्षक जाळी बसवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या :

सोनमाथा या ठिकाणी मोठी टेकडी फोडून भुयारी मार्गाप्रमाणे वनीकरणातून पालखी महामार्ग गेला आहे. या वनीकरणात चिंकारा हरणासह, लांडगे, खोकड, तरस, उदमांजर, साळींदर, घोरपडी यांसह अन्य पशुपक्षी मोठ्या संख्येने आहेत. यापूर्वी ते रस्ता सहज ओलांडून ये-जा करत होते. परंतु, सध्या येथील टेकडी पूर्णपणे खोदून रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वनीकरणाचा संपर्क पूर्णपणे तुटल्याने वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोठा रस्ता झाल्याने वाहने वेगात जात आहेत. त्यामुळे प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे.

यासाठी निमगाव केतकीतील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या वतीने वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ओव्हर ब्रिज करावा किंवा या दोन्हीही वनीकरणाच्या रस्त्याच्या बाजूला उंच संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. रस्त्याच्या एका बाजूलाच काही लोखंडी अँगल उभे करण्यात आले. परंतु, त्यानंतर काहीच काम झाले नाही. अद्यापही वन्य प्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांना मोठा धोका होऊ शकतो. त्यासाठी लवकरात लवकर प्राधिकरणाने संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी होत आहे.

या भागातील सोनमाथा टेकडी रस्त्यासाठी खोदल्याने वन्यप्राण्यांचा अधिवास संपुष्टात आला आहे. या ठिकाणी केवळ वनीकरणाच्या दोन्ही बाजूंना कंपाऊंड जाळ्या लावाव्यात तसेच दोन्ही वनीकरणास जोडण्यासाठी पालखी महामार्गावर वीस फूट रुंदीचा ओव्हर ब्रिज बांधावा. त्यावरदेखील दहा ते बारा फूट उंचीच्या जाळ्या बसवाव्यात. त्यामुळे वन्यप्राणी एका वनीकरणातून दुसर्‍या वनीकरणात सहज वावरू शकतील. तसेच या भागात मोठे फलक लावून वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे असे फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे सदस्य वैभव जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news