सांगली : मराठा आरक्षणासाठी तिसंगीत नेत्यांना गावबंदी; मतदानावर बहिष्कार | पुढारी

सांगली : मराठा आरक्षणासाठी तिसंगीत नेत्यांना गावबंदी; मतदानावर बहिष्कार

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी गावातील सर्व ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आलेली आहे. तसेच या पुढील काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही ठराव ग्रामस्थांनी केला आहे. याबाबतचे निवेदन कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर सरपंच रोहिणी प्रदीप सावळे आणि उपसरपंच तानाजी शंकर कदम यांच्या सह्या आहेत.

याबाबत बोलताना तिसंगीचे उपसरपंच तानाजी कदम म्हणाले, गेली ३० ते ४० वर्षे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आम्ही लावून धरली आहे. सत्तेवर येणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी समाजाला फक्त गाजर दाखविण्याचे काम केले आहे. यामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांचाही समावेश आहे. अनेक मराठा नेत्यांना सत्ता गेल्यानंतर विरोधात बसल्यानंतर समाजाला आरक्षण मिळावे असं वाटतयं. पण सत्तेत आल्यानंतर समाजाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. जालना जिल्ह्यात मराठा समाज बांधवांवर केलेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो आहे. यापुढे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा लढा आणखी तीव्र करणार आहोत.

आजपासून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावात येवू देणार नाही. तसेच यापुढे होणा-या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा टाकण्याचा ठराव ग्रामस्थांच्या संमतीने घेण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button