येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खराडी परिसरातील (सर्व्हे नं. 37/1/1) डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेला झोपडपट्टी बचाव कृती समितीने विरोध केला आहे. 'एसआरए'पेक्षा आम्हाला आहे त्या ठिकाणी पक्की घरे बांधून मिळावीत, अशी मागणी या ठिकाणच्या रहिवाशांनी केली आहे.
कृती समितीच्या वतीने प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एसआरए योजना मंजूर करण्यासाठी रहिवाशांची दिशाभूल करून सह्या घेतल्या आहेत. एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्तींची वेगवेगळी नावे, कागदपत्रे बनवून पात्र करून घेतले आहे. अशा प्रकारे 70 टक्क्यांपेक्षा अधिक संमती मिळवली आहे. मूळ कागदपत्रे आणि जुने रहिवासी असताना त्यांना अपात्र केले आहे. 'एसआरए'च्या अधिकार्यांनी स्थळपाहणी न करता विकसकाकडून पैसे घेऊन कार्यालयात बसून पात्रता यादी बनविल्याचा आरोपदेखील रहिवाशांनी केला आहे. या योजनेविरोधात आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शहराध्यक्षा आरती साठे म्हणाल्या की, एसआरए योजना राबविण्यासाठी रहिवाशांना विश्वासात न घेता संमती मिळविल्या आहेत. एसआरए योजना राबविणारे विकसक हे महापलिकेच्या यादीत 'ब्लॅक लिस्ट'मध्ये आहेत. त्यांनी तात्पुरती निवासाची सोय नाल्याच्या कडेला केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी राहणार्या रहिवाशांना पात्र ठरविले नाही.
विकसकामार्फत काम करणारे प्रदीप साठे म्हणाले की, लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीमध्ये दिवस काढल्याने त्यांना चांगल्या दर्जाचे घर मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ज्या लोकांचे वस्तीमध्ये गैरव्यवसाय चालतात, असेच लोक योजनेला विरोध करीत आहेत. ज्यांची कागदपत्रे आहेत त्यांना घरे मिळतील.
खराडी परिसरातील 'एसआरए'च्या पात्रता यादीतील लोकांच्या नावावर आक्षेप घेऊन तक्रारी आल्यास सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासून त्यांना पात्र-अपात्र ठरविले जाईल.
– प्रतिभा इंगळे, सचिव तथा अप्पर जिल्हाधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
हेही वाचा