

शिरोली एमआयडीसी ; पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली गावाजवळील रुक्मिणी मंगल कार्यालयासमोर भरधाव डंपरने दुचाकीस पाठीमागुन जोराची धडक दिली. हि धडक इतकी जोराची होती की, या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव संतोष मलगोंडा पाटील (वय ३४) रा. जणवाड ता. चिक्कोडी जि. बेळगावी असे आहे. तो शिरोली येथील सांगली फाटा परिसरात असणाऱ्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करित होता.
सकाळी दहाच्या सुमारास कामावर हजर होण्यासाठी तो आपल्या मोटारसायकलवरुन निघाला होता. त्याचे सहकारी त्याच्या सोबत येत होते. त्यांच्यासमोरच उंचगावकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने संतोषच्या गाडीस पाठीमागुन जोरदार धडक दिली. या धडकेत संतोष खाली पडला असता डंपरने त्यास अक्षरशः चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
डंपर चालकाने डंपर सोडून घटनास्थळावरून पळ काढला. आपल्या सहकार्याचा आपल्या डोळ्यासमोर झालेला मृत्यू पाहुन त्याचे सहकारी घायमोकलुन रडत होते. १०८ क्रमांकाच्या अँब्युलंन्सने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. या अपघाताने महामार्गावरील वहातुकीची काही काळ कोंडी होऊन वहानांच्या रांगा लागल्या होत्या. या आपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली असुन, सपोनि पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मोहिते मॅडम तपास करित आहेत.
हेही वाचा :