Pune News : ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ची अंमलबजावणी नाहीच; ससूनमधील चित्र | पुढारी

Pune News : ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ची अंमलबजावणी नाहीच; ससूनमधील चित्र

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयामध्ये एप्रिलपासून रुग्णांना कोणतीही औषधे बाहेरून आणावी लागणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर औषध खरेदीची रक्कम पाचपटींनी वाढली आहे. मात्र, कधी अ‍ॅसिडिटीच्या गोळ्या, कधी त्वचेच्या आजारावरील क्रीम, कधी डोळ्यांचे ड्रॉप, तर कधी सुचर (ड्रेसिंगसाठी लागणारे साहित्य) बाहेरून आणण्याची वेळ रुग्णांवर येत आहे.

संबंधित बातम्या :

ससून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमधूनच मोफत औषधे मिळावीत, यासाठी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी 3 एप्रिलपासून ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ ची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी लिहून देणाऱ्या डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, केवळ तोंडी समज देण्याचा अपवाद वगळता कोणत्याही डॉक्टरांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. ससूनच्या मेडिकल स्टोअरमध्ये बरेचदा औषधे उपलब्ध नसतात, त्यामुळे रुग्णांना औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जाते. गरीब रुग्णांनाबाहेरून औषधे आणण्याशिवाय पर्याय नसतो. अतिरिक्त 225 प्रकारच्या औषधांची खरेदी केली आहे.

खरेदी वाढली, औषधे आहेत कोठे?

ससून रुग्णालयामध्ये औषधांची ‘ए’ ते ‘ई’ अशी पाच प्रकारची वर्गवारी करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गवारीतील औषधे ससूनच्या मेडिकल स्टोअरमध्येच उपलब्ध व्हावीत, यासाठी औषध खरेदीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2022 या कालावधीत 58 लाख 79 हजार 173 रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली. जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत 3 कोटी 6 लाख 41 हजार 84 रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. खरेदीची रक्कम पाचपट वाढलेली असताना साधी औषधेही का उपलब्ध होत नाहीत, हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे.

औषधांची खरेदी रक्कम पुढीलप्रमाणे

वर्ग औषधांचा प्रकार जाने. ते ऑगस्ट 2022 जाने ते ऑ. 2023
ए अँटीबायोटिक्स 15,72,797 38,14,137
बी पेनकिलर 18,80,941 1,00,53,146
सी आय, इयर ड्रॉप 11,03,088 53,44,484
डी आयव्ही फ्लुईड, ड्रेसिंग 13,22,347 58,80,549
ई अँटी कॅन्सर 0 – 55,48,768
एकूण 58,79,173 – 3,06,41,084

सुचरसाठी लागणा-या साहित्याची दोनदा ऑर्डर दिली आहे. वेळेत साहित्य प्राप्त न झाल्यास स्थानिक खरेदी केली जाईल. डोळ्यांची औषधे का उपलब्ध नाहीत, याबाबत माहिती घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल. रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ दिली जाणार नाही.

– डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय.

हेही वाचा

पुणे : अपात्र 603 कर्मचार्‍यांचा फेरविचार करण्याची मागणी

Pune news : स्मार्ट सिटीचे अर्धवट प्रकल्प घेण्यास महापालिकेचा नकार

Nashik Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज

Back to top button