Baramati News : कोंबड्यांनी माना टाकल्या; वाढत्या उन्हाचा परिणाम | पुढारी

Baramati News : कोंबड्यांनी माना टाकल्या; वाढत्या उन्हाचा परिणाम

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तब्बल तीन महिन्यांपासून बारामती तालुक्यात पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्र तेमुळे पोल्ट्री व्यवसाय आता अडचणीत आला आहे. बारामती तालुक्यात उष्णतेने पोल्ट्रीतील पक्षी मरण्याचे प्रमाण वाढले आहे. कोंबड्यांनी माना टाकल्याने पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले आहेत. विविध उपाययोजना करून कोंबड्या जगाविण्यासाठी व्यावसायिक प्रयत्न करीत आहेत.

अतिउष्णतेचा परिणाम शेतीसह पोल्ट्री व्यवसायावर होऊ लागला आहे. पावसाळ्याचे दिवस असताना पावसाचा पत्ता नाही. वातावरणात उकाडा आहे. अतिउष्णतेमुळे कोंबड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी व्यावसायिकांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत; मात्र यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचा खर्चही वाढलेला आहे.

प्रचंड उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. पशुपक्ष्यांवरही उन्हाचा परिणाम जाणवू लागला आहे. पोल्ट्रीमधील पक्ष्यांना अतिउष्णतेने त्रास होत असल्याने शेतकरी पोल्ट्रीमध्ये फॅन बसवत आहेत; तर पक्ष्यांना थंडावा मिळावा म्हणून बारदाना पोती, उसाचा पालापाचोळा ओला करून पत्रा शेडवर टाकला जात आहे. पाण्याच्या पाईपने वारंवार शेडवर पाणी फवारावे लागत आहे. उष्णतेमुळे पक्ष्याची मर वाढली असून वजनही घटत आहे.

चहूबाजूने पोल्ट्री व्यावसायिकांची कोंडी

मागील आठ दिवसात प्रचंड ऊन आणि सायंकाळी पावसाचे वातावरण असे चित्र आहे. तुलनेत दिवसा सकाळी 8 पासून ते दुपारी 4 पर्यंत कडकडीत ऊन पडते. यामुळे तापमानात झालेली वाढ प्राणी, पक्षी व शेतातील पिकांना हानिकारक ठरत आहे. पोल्ट्रीतील पिल्लांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळे पक्षी मरत असल्याने नुकसान वाढले आहे. त्यातच पक्ष्यांचे खाद्य व वैद्यकीय उपचार महागले आहेत. कोंबड्या उष्णतेने कमी खाद्य खातात. परिणामी कोंबड्यांचे वजन कमी भरते आहे, अशी माहिती निंबूत (ता. बारामती) येथील पोल्ट्री व्यावसायिक विजय लकडे यांनी दिली.

हेही वाचा

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांच्या गर्दीची चिंता मिटणार!

पुण्यात पाकिस्तानच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

Balasaheb Thorat : पक्षांतर बंदी कायद्याचे पालन होत नाही : आ. थोरात

Back to top button